मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील आर एफ ओ पदाचा पदभार मीनाक्षी पवार यांनी नुकताच घेतला आहे. हिंगोली कार्यक्षेत्रात वन पर्यटनाला चालना देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र वन विभागाच्या हिंगोली येथील विभागीय कार्यालया अंतर्गत हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वा टाक यांची सामाजिक वनीकरण विभागात आर एफ ओ पदावर नियुक्ती झाल्यानंतर हिंगोली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार औंढा नागनाथ वनपरिक्षेत्र अधिकारी कुंडलीकहोरे यांच्याकडे देण्यात आला होता. सदरील पदावर पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून वर्धा येथे कार्यरत असलेल्या वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार यांची नियुक्ती झाली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी हिंगोली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून 30 नोव्हेंबर रोजी पदभार घेतला. कार्य कुशल अधिकारी म्हणून मीनाक्षी पवार यांची ओळख असून पदभार घेतल्यानंतर त्यांनी हिंगोली वनपरिक्षेत्रात वन पर्यटनाला चालना देणार असल्याचे सांगितले. वारंगा फाटा येथील वन पर्यटन स्थळी आवश्यकता सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील हिंगोली वनपरिक्षेत्रात आणखी नवीन वन पर्यटन स्थळांचा शोध घेऊन त्यांचा विकास केला जाईल असेही त्यांनी सांगितले. तसेच अतिक्रमणावरही कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे सध्या रब्बी हंगाम सुरू असून वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणार असल्याचे सांगितले. तसेच वृक्षतोडीला आळा घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मीनाक्षी पवार या कळमनुरी तालुक्यातील नागरिक असून आपल्या मातृभूमीची सेवा त्यांना करण्यास मिळत असल्याचे भाग्य मला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2016 च्या कॅडर असून आत्तापर्यंत त्यांची जेथे कुठे नियुक्ती झाली तेथे आपल्या कर्तव्याची साक्ष त्यांनी दिली आहे. कर्तव्य कठोर म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांची हिंगोली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी पदी नियुक्ती झाल्याने त्यांचे विभागीय वन अधिकारी बी. एच. कोळगे यांच्यासह वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.