मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – सकल मातंग समाज आणि समाजातील समस्त कर्मचारी वर्ग हिंगोली यांच्यातर्फे नाविन्यपूर्ण ‘जिथे कमी तिथे आम्ही’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत 18 जून रोजी सकाळी 11 वाजता कै. शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली येथे इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश पांडुरंग खिल्लारे हे उपस्थित राहणार असून उद्घाटक म्हणून हिंगोली येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ हिंगोली भूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर अमोल धुमाळ हे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून अराजपत्रित मुख्याध्यापक नांदेड तथा लहुजी साळवे कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व थोर विचारवंत बालाजी थोटवे हे उपस्थित राहणार आहेत.
नुकतेच महाराष्ट्र शिक्षण मंडळ शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाचा निकाल घोषित झाला आहे.
या निकालामध्ये कोणतेही पुरेसे साधने नसताना तसेच कोणतीही शिकवणी नसताना रोज मजुरी करून पोट भरणाऱ्या तसेच शिक्षणाची पार्श्वभूमी नसलेल्या मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी भरगच्च यश प्राप्त केले आहे.
या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार आणि त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या उपक्रमांतर्गत 18 जून रोजी (रविवार) सकाळी 11 वाजता कै. शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली येथे गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सकल मातंग समाज आणि समाजातील समस्त कर्मचारी वर्ग हिंगोली यांच्या वतीने इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये भरगच्च यश संपादन करून केवळ पैशाअभावी पुढील शिक्षण घेताना येणाऱ्या व प्रतिकूल परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या उपक्रमांतर्गत मदत केली जात आहे. या उपक्रमाचे हिंगोली जिल्ह्यासह राज्यभरात कौतुक केले जात आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मातंग समाज आणि समाजातील समस्त कर्मचारी वर्ग हिंगोली तसेच आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे कर्मचारी महासंघ हिंगोली चे आत्माराम गायकवाड यांनी केले आहे.