मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील माधव हॉस्पिटल चे डॉ. बगडिया मयत व्यक्तीच्या नातेवाइकांकडून मृतदेह देण्यासाठी पैशांची मागणी करू लागला होता. पैसे दिल्याशिवाय मृतदेह देणार नाही, अशी जणू गाठ या हॉस्पिटल च्या बगडिया ने बांधली होती. सदरील प्रकार शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार संतोष (दादा) बांगर यांना समजताच त्यांनी डॉ. बगडीयाचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर डॉ. बगडियाने मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला.
हिंगोली येथील काही प्रसिद्ध रुग्णालयातील डॉक्टर मंडळींकडून खेड्यापाड्यातील रुग्णांकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरमसाठ पैसे उकळण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात, परंतु मयत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून देखील पैसे उकळण्याचा प्रकार हिंगोली येथील माधव हॉस्पिटलमध्ये घडला.
मौजे झरा येथील जिजाबाई संभाजी तडस (वय 70 वर्ष) या वृद्ध महिलेस तिच्या नातेवाईकांनी तब्येत खराब झाल्याने हिंगोलीतील माधव हॉस्पिटल येथे ऍडमिट केले होते. तेव्हा डॉ. बगडिया याने आपल्याकडे पिवळ्या राशन कार्डची रुग्णांसाठी स्कीम असून तुम्हाला एकही रुपया लागणार नाही. तुम्ही तुमच्या पेशंटला माझ्याकडेच ठेवा मी तुमचा पेशंट चांगला करून देईन असे आश्वासन दिले. मयत जिजाबाई या तीन दिवस ऍडमिट होत्या.
या दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांकडून तीस हजार रुपये बिल घेण्यात आले. दि. 23 रोजी जुलै रोजी सकाळी सात वाजता सदर महिला पेशंट मयत झाला; परंतु पैशाच्या हव्यासापोटी माणुसकी खुंटीला टांगलेल्या हैवान डॉ. बगडियाने रुग्णांच्या नातेवाईकांना पैशाची मागणी केली आणि माझे उर्वरित 20 हजार रुपये बिल द्या अन्यथा मी मयत पेशंटची बॉडी नेऊ देणार नाही, अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्यावर मयत जिजाबाई तडस यांच्या नातेवाईकांनी संवेदनशील आमदार संतोष (दादा) बांगर यांना फोनवर घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावर मानवतेला काळीमा फासणाऱ्या रुग्णालयाचा व डॉ. बगडियाचा आमदार संतोष (दादा) बांगर यांना चांगलाच राग आला. त्यांनी माधव हॉस्पिटलच्या डॉ. बगडिया यास चांगलेच धारेवर धरत मयत रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे लुबाडण्याचे लूचाट प्रकार ताबडतोब थांबवा अन्यथा तुमच्या रुग्णालयात चालू असलेल्या शासकीय स्कीम मला बंद कराव्या लागतील असा सज्जड इशारा सुद्धा दिला. तसेच सदर डॉ बगडिया हा माधव हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक वर्षापासून रुग्णांना लुबाडण्याचे प्रकार करत आहे.
या सर्व प्रकाराची तक्रार शासन दरबारी करून सदर रुग्णालय व डॉ. बगडिया यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी आमदार संतोष (दादा) बांगर यांनी प्रशासनाकडे करणार असल्याचे सांगितले कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने लुचाट डॉक्टरचा खरपूस समाचार घेऊन माधव हॉस्पिटल बंद करण्यात येईल, असा इशारा देखील आमदार संतोष (दादा) बांगर यांनी यावेळी दिला. यापुढे कुठल्याही गोरगरीब रुग्णांना जर एखादा डॉक्टर अनावश्यक लुबाडत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील आमदार संतोष (दादा) बांगर यांनी यावेळी केले.