मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :-
सेनगाव – राज्य शासनाकडून प्रस्तावित कृषी निविष्ठा कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सेनगाव येथे सेनगाव तालुका कृषी असोसिएशनच्या वतीने 4 नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात आले.
राज्य शासन कृषी निविष्ठांच्या विक्रेत्यांवर कायदे अमलात आणण्याच्या प्रक्रियेत आहे. यातील तरतुदी जाचक स्वरूपाच्या असल्याने प्रस्तावित कायदा कलम 40, 41, 42, 43 व 45 हे रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील 70 हजार कृषी निविष्ठा विक्री केंद्राचे संचालक तीन दिवसाच्या संपावर आहेत.
कृषी निविष्ठा विक्री करण्याविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यासाठी सध्या प्रचलित कायदे पुरेसे असताना राज्य शासनाकडून नवीन कायदे करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रस्तुत कायद्यातील तरतुदी विक्रेत्यांसाठी जाचक आहेत. राज्यातील कृषी विक्रेते कोणत्याही प्रकारचे कृषी निविष्ठा उत्पादन करीत नाही. सीलबंद निविष्ठा ही कृषी विभागाकडून प्रमाणित असते. नंतरच विक्रेते हे कृषी केंद्र मार्फत विकतात.
मात्र यामध्ये कृषी केंद्र चालकावर जाचक कायदे लागून त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे लादण्याचा प्रयत्न होत आहे. या विरुद्ध बंद पुकारण्यात आला असून या विरुद्ध येणाऱ्या काही दिवसात राज्यात तीव्र प्रसाद उमटण्याची शक्यता आहे, असे सेनगाव तालुका कृषी असोसिएशनच्या वतीने प्रसारित करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकावर नंदलाल मुंदडा, विलास कापसे, नंदकिशोर झंवर, प्रतापराव कोटकर, सुधीर शिंदे, सारंगधर रोडगे, नागेश तोष्णीवाल, सुधीर गायकवाड, आशिष पायघन, शंकरआप्पा मस्के, मुटकुळे, वैजनाथ कोटकर, रामेश्वर वाळके, नितीन शिंदे, दामोधर पतंगे, बालाजी कोटकर, गौरव जंगले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.