मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील जिल्हा पोलीस दलाकडून जातीय सलोखा व सामाजिक सदभावना उपक्रमांतर्गत कौमी एकता क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नरसी नामदेव व कळमनुरी पोलीस ठाणे यांच्यात क्रिकेटचा सामना खेळविण्यात आला. यामध्ये कळमनुरी पोलीस ठाणेचा संघ विजयी झाला.
हिंगोली जिल्ह्यात जातीय सलोखा अबाधित राहून शांतता नांदावी सर्व नागरिकांनी सर्व जाती-धर्मांचा सन्मान व आदर राखून सामाजिक सद्भावना वाढावी या उद्देशाने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात जिल्हा पोलीस दला अंतर्गत कौमी एकता क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर या दरम्यान संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर खेळविली जाणार आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 13 पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखा त्यामध्ये हिंगोली शहर, बासंबा, कळमनुरी, औंढा नागनाथ, गोरेगाव, नरसी नामदेव, सेनगाव, हिंगोली ग्रामीण, वसमत शहर, आखाडा बाळापुर, हट्टा, वसमत ग्रामीण, कुरुंदा हे 13 पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय शहर, वाहतूक शाखा असे एकूण 16 क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सदरील सर्व संघात संबंधित पोलीस ठाण्याचे 6 खेळाडू व इतर 5 खेळाडू हे त्या – त्या पोलिस ठाणे हद्दीतील विविध जाती, धर्मातील युवक खेळाडू यांचा समावेश असणार आहे. स्पर्धेतील विशेष संपन्न व व्यक्तिगत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा ट्रॉफी व चषक तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला जाणार आहे.
10 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, पोलीस निरीक्षक नरेंद्र पडळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू व इतर अधिकारी, अंमलदार, खेळाडू व प्रेक्षक नागरिक उपस्थित होते.
सुरुवातीचा सामना कळमनुरी पोलीस ठाण्याविरुद्ध नरसी नामदेव पोलीस ठाणे यांच्यात खेळविण्यात आला. यामध्ये कळमनुरी संघाने 16 धावांनी हा सामना जिंकला.