मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :-
सेनगाव – येथील 952 या क्षेत्रफळातील अंदाजे 75 जणांचे प्लॉट आहेत; मात्र यातील अनेकांच्या नावे सातबारा नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच घरही बांधता व विकताही येत नसल्याने येथील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. सदरील गटातील क्षेत्रफळ दुरुस्त करून गटातील सर्वांच्या नावे 7/12 ला नोंद करून घ्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी सेनगाव तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सेनगाव येथील गट क्रमांक 952 मध्ये अनेक नागरिकांनी प्लॉट खरेदी केले आहेत. त्यामध्ये अंदाजे 75 जणांनी या क्षेत्रफळामध्ये जागा विकत घेतलेले आहेत. त्यातील प्लॉट हे नगरपंचायत सेनगावला लागलेले आहेत.
मात्र सदरील प्लॉटच्या खरेदी – विक्रीसाठी किंवा बँकेत लोन साठी सदरील घरे 7/12 ला नोंद असायला पाहिजे त्याशिवाय येथील नागरिकांना कोणताच लाभ घेता येत नाही. गटात राहणारे काही कर्मचारी हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना त्यांचे घर विकून मूळ गावी जायचे असले तरी त्यांना खरेदी – विक्री करता येत नाही.
काही कर्मचाऱ्यांना बांधकाम करायचे असल्यास बांधकामासाठी एखाद्या बँकेकडून जर लोन घ्यायचे असेल तर सदरील बँकाही 7 /12 नसल्याने लोन देण्यास टाळाटाळ करते. 7/12 नसल्याने एकाही बँकेकडून लोन मिळत नाही.
तसेच येथील नागरिकास त्यांच्या मुलीचे लग्न करायचे असेल आणि त्यासाठी जर घर विकायचे असेल तर त्यांना सदरील घरही विकता येत नाही. त्यामुळे सदरील अडचणी लक्षात घेऊन तात्काळ गट क्रमांक 952 या गटातील क्षेत्रफळ दुरुस्ती करावी.
तसेच गटातील सर्व नागरिकांच्या नावे 7/12 नोंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संतोष देशमुख, नारायण इंगळे, गजानन विटकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.