मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी आज एक अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. सदरील नामनिर्देशन पत्र शिवसेना पक्षाचे उमेदवार हेमंत पाटील यांचे आहे.
हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला गुरुवार, दि. 28 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या मतदार संघासाठी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
आज नामनिर्देशनपत्र वितरण व स्विकृतीच्या दुसऱ्या दिवशी 14 उमेदवारांना 56 अर्जांचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण 54 इच्छुक उमेदवारांना 175 नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्षाचे उमेदवार हेमंत श्रीराम पाटील यांनी एक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी तसेच अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्यासह निवडणूक याकामी नियुक्त अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे 4 एप्रिलपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील.
रविवार, दि. 31 मार्च रोजी नामनिर्देशन पत्र वितरण व स्वीकृती बंद राहणार आहे. शुक्रवार, दि. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 8 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.