मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या अंतर्गत सर्वच शाळकरी मुलांना दोन मोफत गणवेश, एक जोडी बूट व दोन पायमोजे देण्यात येणार आहेत. यासाठी शासनाकडून सन 2024 – 25 च्या अर्थसंकल्पात (17 हजार लक्ष) निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुधारित आरटीई कायद्यास अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्य शासन ताळ्यावर आले आहे. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.
तसेच सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्याबाबतचा निर्णय 6 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेसाठी निर्धारित केलेल्या प्रति गणवेश रुपये 300 याप्रमाणे राज्य शासनाने सुद्धा दोन गणवेशासाठी रुपये 600 प्रति विद्यार्थी रक्कम निश्चित केली आहे.
मोफत गणवेश योजनेप्रमाणेच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना सन 2023 – 24 पासून दरवर्षी एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शाळा व्यवस्थापन समिती मार्फत देण्यात येत आहे. यासाठी प्रति विद्यार्थी 170 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
प्रस्तुत योजनेसाठी सन 2024 – 25 मधील अर्थसंकल्पात 17 हजार लक्ष एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली असून या शासन निर्णया प्रमाणे वितरित करण्यास मान्यता देण्यात येत असलेला निधी 8 हजार 500 लक्ष एवढा आहे. याबाबतचे शासन परिपत्रक 17 मे 2024 रोजी करण्यात आले आहे.