मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – अन्न व सार्वजनिक वितरण केंद्रीय विभाग, मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार यांचे दि. 06 जानेवारी, 2022 रोजीचे पत्र व मा. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, मुंबई यांचे दि.2 फेब्रुवारी, 2022 रोजीच्या पत्रान्वये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषण 2.0 अभियान अंतर्गत देशाला कुपोषणमुक्त करण्यासाठी व ॲनिमियाविरुध्द लढण्यासाठी सन 2024 पर्यंत फोर्टिफाईड तांदळाचे वितरण संपूर्ण देशात करण्यात येत आहे.
फोर्टिफाईड तांदुळ हा साध्या तांदळामध्ये सूक्ष्म पोषक घटक मिसळून तयार केलेला असतो. या मध्ये लोह, फॉलिक ॲसिड आणि जीवनसत्त्व ब-12 असल्याने शरीरास अधिक प्रमाणात पोषण मिळते. या फोर्टिफाईड तांदळाची चव, वास व शिजवण्याची पध्दत ही सामान्य तांदळाप्रमाणेच असते. फोर्टिफाईड तांदळामुळे अधिक प्रमाणात सूक्ष्म पोषक घटक असल्याने ॲनिमिया व कुपोषण यांचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
फोर्टिफाईड तांदूळ हा जरी सामान्य तांदळापेक्षा दिसण्यास काही प्रमाणात वेगळा असला तरीही, यामुळे पालकांनी घाबरुन संभ्रम निर्माण करण्याची आवश्यकता नाही. कारण त्यामुळे बालकांना अधिक प्रमाणात पोषण मिळणार आहे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व पालकांना केले आहे.
फोर्टिफाइड तांदळाबाबतची जनजागृती विभागामार्फत करण्यात आलेली आहे. तसेच नागरिक व पालकामध्ये जनजागृती करण्यासाठी व त्यांना फोर्टिफाईड तांदळासंदर्भात अधिक माहिती मिळण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्राप्त झालेल्या रेडिओ जिंगल्स, संवाद गीत व शार्ट व्हिडिओ खालील लिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.