Marmik
Hingoli live

लोकशाहीचा लोकोत्सव : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी! मतदान क्षेत्रातील कामगारांना 2 ते 3 तासाची सवलत

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यात 15-हिंगोली लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी दि. 26 एप्रिल, 2024 रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी. तसेच मतदान क्षेत्रातील कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर कमीत कमी दोन ते तीन तासाची सवलत देता येईल, असे सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

राज्यात तसेच राज्याच्या सीमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

ही सुट्टी उद्योग उर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यामध्ये खाजगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, व्यापार, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादींना लागू राहील.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी केवळ कमीत कमी दोन ते तीन तासाची सवलत देता येईल.

मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासाची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. 

 उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी, व्यवस्थापनाने वरील सूचनाचे योग्य ते अनुपालन करून कामगारांना सुट्टी अथवा सवलत द्यावी.

याबाबत मतदारांकडून मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त झाली नसल्यामुळे मतदान करता आले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

Related posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री नागनाथाचे दर्शन

Gajanan Jogdand

पत्रकार बबन सुतार यांना पितृशोक

Gajanan Jogdand

आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या 12 सोशल मीडिया वापरकर्त्यावर कारवाई

Gajanan Jogdand

Leave a Comment