मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – चोंडी येथे पिस्टलमधून गोळीबार करून बँक लुटीचा प्रयत्न करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने आगामी सण, उत्सवानिमित्त जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध व बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कार्यवाहीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून हिंगोली जिल्हा हद्दीत गोपनीय माहिती काढून कार्यवाहीचे आदेश दिले होते.
या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने 15 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पिस्टल मधून गोळीबार करून चोंडी येथील बँक लुटीचा प्रयत्न केलेला रेकॉर्डवरील आरोपी नामे अयाज अहमद मोहम्मद गफूर (वय 30 वर्ष रा. बुखारी तकिया वसमत जि. हिंगोली) यास ताब्यात घेतले.
त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केले असता त्याने त्याच्या ताब्यातील एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे (अंदाजे किंमत 52 हजार रुपयांचा) मुद्देमाल काढून दिला.
सदर आरोपी विरुद्ध वसमत पोलीस ठाणे येथे एक जबरी चोरी, कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीत एक जबरी चोरी व दरोडा, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाणे हद्दीत एक जबरी चोरी, असे दरोडा व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीस ताब्यात घेऊन पिस्तूल जप्त केल्याने भविष्यात होणाऱ्या गुन्ह्यास प्रतिबंध झाला आहे.
सदरील आरोपी विरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुरनं. 636 / 2023 कलम 3 / 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे आकाश टापरे, नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे यांनी केली.