मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या 18 डिसेंबर रोजी निवडणुका चे मतदान होणार आहे. सदरील मतदानासाठी कामगारांना आपला हक्क बजावता यावा म्हणून निवडणूक आयोगाने कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी दिली आहे. याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यात दिनांक 18 डिसेंबर, 2022 रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक-2022 साठी उद्योग उर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, इत्यादी ( खाजगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर , मॉल्स, रिटेलर्स इ.) यांना निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कमीत कमी दोन तासाची सवलत देण्यात यावी. त्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.