मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व शूरवीरांच्या नावांचे वाचन केले.
लडाखमधील हॉट स्प्रिंग येथे 21 ऑक्टोबर 1959 रोजी एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने भारत – चीन सीमेवर पहारा देणाऱ्या एका तुकडीवर चिनी सेनेच्या सैनिकांनी अचानक हल्ला चढविला.
सदर हल्ल्यात भारतीय जवानांनी अत्यंत शौर्याने तोंड देऊन देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ तसेच वर्षभरात ज्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी कर्तव्य बजावत असताना आपल्या आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सबंध भारतात दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे पोलीस स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमास हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाजी आमले यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी सदर कार्यक्रमात शहीद स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली येथील पोलीस गार्डने हवेत बंदुकीच्या तीन फेरी झाडून श्रद्धांजली वाहिली.
गत वर्षात 1 नोव्हेंबर 2021 ते 31 ऑगस्ट 2022 भारतात एकूण 261 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे व सहाय्यक पोलीस अधीक्षक येथे देशमुख यांनी या सर्व शूरवीरांच्या नावांचे वाचन केले.