मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या टवाळखोर 7 व्यक्तींवर कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस व जनता सुसंवाद वाढविण्यावर विशेष करून शाळा, महाविद्यालय तसेच शिकवणी व वसतिगृह या ठिकाणी त्याचप्रमाणे शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, बाल उद्यान, मुख्य बाजारपेठ परिसर, धार्मिक स्थळे व इतर गर्दीच्या ठिकाणी मुली, महिला व बालकांना सुरक्षितता वाटावी म्हणून दामिनी पथकास विशेष सूचना देऊन कार्यरत केले आहे. तसेच विनाकारण आरडाओरड करणाऱ्या व्यक्तीवर आळा घालून प्रतिबंधक कार्यवाही केली आहे.
दामिनी पथकाने वेगवेगळ्या शिकवणी वर्गावर जाऊन तसेच वेगवेगळ्या शाळेवर जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यांना योग्य मार्गदर्शन केले.
तसेच त्यांना कायदेविषयक माहिती देऊन गुड टच, बॅड टच बाबत सविस्तर माहिती सांगून संकटकालीन डायल 112 बाबत माहिती दिली. तसेच बालविवाह बाबत सविस्तर माहिती देऊन त्यांना कवायत बाबत माहिती दिली.
सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, पोलीस हवलदार चिलगर, महिला पोलीस अंमलदार आरती साळवे, अर्चना नखाते, पोलीस अंमलदार चंद्रशेखर देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सदर दामिनी पथकाने मागील आठवड्यात दि. 11 ते 17 डिसेंबर 2023 दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील शाळा व इतर 51 महत्त्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या.
हिंगोली बस स्थानक व देवडा नगर येथील बाल उद्यान, रामलीला मैदान व इतर ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या व सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या टवाळखोर अशा 7 व्यक्तीवर कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली व समज देऊन त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूप दिले.
तसेच दामिनी पथकाने अडचणीच्या वेळी तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइन 8007000493 तसेच डायल 112 ची सेवा सुद्धा सुरू करून त्याचा प्रसार केला आहे.