हिंगोली : संतोष अवचार
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून याबाबत शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष (दादा) बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. या माहितीवरून मुख्यमंत्र्यांनी हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात हाहाकार माजला आहे. अतिवृष्टीमुळे खेर्डा सर्कलमधील भटसावंगी तांडा, धानापुर, धोतरा, सागद, सिरसम बु. सिरसम खु. खानापूर ,उमरखोजा,सांडस, पिंपळदरी, सावरगाव, बोर्जा,तिखाडी, डोंगरकडा, पेडगाव, बाळापूर, शेवाळा, सांडस सालेगाव, नांदापुर, कंजारा, पुर व इतर काही गावे तसेच आखाडा बाळापूर जवळील काही गावे आणि हिंगोली जिल्ह्यातील इतर अनेक गावातील शेतीचे व घरादारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही बाब हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे संवेदनशील आमदार संतोष (दादा) बांगर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकताच माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने हिंगोली जिल्हाधिकारी यांना फोनद्वारे अतिवृष्टी भागाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.