मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी:-
हिंगोली – जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून अवघ्या काही दिवसांवर आलेला खरीप हंगाम पेरावा कसा, असा प्रश्न उभा राहिला आहे. अवकाळी पावसाने आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भारतीय युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील दोन महिन्यापासून सतत अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. यामध्ये हळद, कांदा, उन्हाळी मूग, उडीद, केळी पिकांचे व फळबागांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
सर्वच उन्हाळी पिके ही शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असतो. पुढील खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लागणारा आर्थिक खर्च हा बहुतांश उन्हाळी पिकांवरच अवलंबून असतो. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ खरीप हंगाम पेरण्यासाठी पैशांची चणचण आहे.
शेतकरी अवकाळी पावसाने मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून शासनाकडून त्यांना आर्थिक मदत मिळाल्याशिवाय खरीप पेरण्या होणे शक्य नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आले आहे. या निवेदनावर भारतीय युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष यश संजयराव देशमुख यांची स्वाक्षरी आहे.