मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – एड्सच्या बाबतीत जागरुकता निर्माण करणे, एचआयव्ही बाधितांना वेगळपेण जाणवू नये, यासाठी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक एडृस दिनाच्या निमित्ताने एचआयव्ही बाधित रुग्णांना समानतेची वागणूक देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाच्यावतीने जागतिक एड्स दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आली होती. या रॅलीस श्री. पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मंगेश टेहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल कदम, डॉ.दीपक मोरे, डॉ.कैलास शेळके, डॉ. सचिन भायेकर, डॉ.किशन लखमावार, डॉ.विजय निलावार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्रातील एकमेव व भारतातील दुसरी अशी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष व एआरटी ची अद्यावत स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. या एआरटी केंद्रामध्ये अनेक प्रकारच्या चाचण्या व औषधे येथे उपलब्ध आहेत. याचे नियोजनबध्दरित्या वाटप करण्यात येत आहे. मागील तीन वर्षापासून तीन वर्षाच्या कालावधीत 30 बालके एचआयव्ही मुक्त करण्याचे काम येथून झाले आहे. हे या कार्यक्रमाचे मोठे यश आहे. आपणाकडे संशयित रुग्णाची माहिती असेल तर त्यांची तपासणी करुन उपचार करुन घ्यावेत. तसेच एचआयव्ही बाधितांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ देण्यासाठी कटिबध्द आहे, असे सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले, तर सूत्रसंचालन विनीत उबाळे यांनी केले.
जागतिक एड्स दिनानिमित्त काढण्यात आलेली रॅली जिल्हा सामान्य रुग्णालय येथून निघून शिवाजी चौक, इंदिरा गांधी चौक मार्गे गांधी चौकात जाऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रतिक फाऊंडेशनच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना बिस्कीटे व पाण्याचे वितरण करण्यात आले. रॅलीच्या सुरुवातीस एड्स दिनाची शपथ घेतली. तसेच नर्सिंग कॉलेच्या मुलींनी एड्स जनजागृतीबाबत पथनाट्य सादर केले.
या रॅलीस नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिंनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रॅली यशस्वी केली.