मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – आमचे हिंदुत्व हे हृदयात राम आणि प्रत्येकाच्या हाताला काम देणारे आहे भाजपाचे हिंदुत्व हे आयाराम गयाराम असे आहे अशी सडकून टीका करत भाजपाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोली येथील जाहीर सभेत भाजपला ठणकावले.
27 जुलै रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या दरम्यान हिंगोली येथील शिवसेना जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली.
या सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वत्र चौफेर फटकेबाजी करत महाराष्ट्रात आणि देशात फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपला चांगलेच धारेवर धरले.
भाजप बरोबरची 30 वर्षाची आमची युती तुटली. मात्र मला भाजपची कीव येते. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हातात भाजपच्या पक्षाचे दांडे राहिले असून झेंडे मात्र इतर पक्षातून आलेलेच फडकावत आहेत.
पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून भाजप मोठा पक्ष म्हणून मिरवत आहे. या पक्षाचे चार, त्या पक्षाचे चार असे नेते आणि पुढारी घेऊन भाजप कोणते हिंदुत्व साध्य करतोय असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच पक्ष सोडून जाणाऱ्या शिवसेना आमदारांचाही चांगलाच समाचार घेतला.
आगामी लोकसभा या लोकशाही विरोधी आणि लोकशाही प्रेमी अशा दोन गटात होतील. तुम्हाला लोकशाही प्रेमीच्या बाजूने लढायचे की, लोकशाही विरोधी बाजूच्या लोकांकडून लढायचे असा प्रश्न उपस्थित नागरिकांना केला.
तसेच मोदी आणि भाजप हे घराणेशाही विरोधात बोलतात असे सांगून हो माझे आजोबा, माझे वडील मी आणि माझा मुलगा हे महाराष्ट्राला माहीत आहे. महाराष्ट्राची जनताच ठरवेल काय करायचे.. ते जनतेने सांगितले तुम्ही घरी जा तर आम्ही घरी जाऊ; मात्र मोदी आणि भाजप आम्हाला सांगणारे कोण असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
मोदी मणिपूरच्या त्या दोन महिलांच्या हातून राखी बांधून घेणार काय?
काही दिवसांपूर्वीच मोदी यांनी त्यांच्या नेत्यांची बैठक घेऊन यंदाच्या रक्षाबंधन सणाला मुस्लिम भगिनींच्या हातून राखी बांधून घेण्यास सांगितले आहे. हे मीच म्हणलो असतो तर मोदी यांनी आमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असते. राखी बांधून घ्या पण ज्यांचा परिवार ठार केला आणि तुमच्या सरकारने या प्रकरणातील आरोपींना सोडले. त्या प्रकरणातील पिढीचा नर्गिस बानो यांच्या हातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राखी बांधून घेणार काय?मणिपूर येथे नग्नधिंड काढलेल्या त्या दोन महिलांच्या हातून नरेंद्र मोदी राखी बांधून घेणार काय असा प्रश्नही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर धार्मिक दंगली घडवून आणण्याचा डाव !
आयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण केले जात आहे. या मंदिरासाठी भाजपने काहीही न करता जनतेचा पैसा आणि काही शासनाच्या पैशातून मंदिराचे निर्माण केले जात आहे. भाजपचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, 1 जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी देशभरातील हिंदू बांधवांना आणि नागरिकांना येथे मोफत रेल्वे आणि बसेस सोडून आणले जाणार असून त्यानंतर तेथे त्यांच्या वाहनांवर मुस्लिम बांधवांकडून दगडफेक करून दोन धर्मात तेढ निर्माण केले जाणार आहे आणि पुन्हा धार्मिक वाद घालून निवडणुका लढविल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही आम्ही जागरूक होणे गरजेचे आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कुलभूषण जाधव चे काय झाले?
देशासाठी लढणारा कुलभूषण जाधव हा पाकिस्तानातील कारागृहात सडत आहे. तो जिवंत आहे की मृत पावला हेही माहित नाही. त्याला मोदी सरकार परत आणणार की नाही सुषमा स्वराज ह्या जिवंत होत्या तोपर्यंत कुलभूषण जाधव हा भारतात परत येईल असे वाटत होते. परंतु सुषमा स्वराज यांच्या मृत्यूनंतर कुलभूषण चे काय झाले हे कोणालाच माहित नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मोदी तुम्ही घमेंडी !
भारताचे चंद्रयान हे चंद्रावर पोहोचत होते. तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तेथे राहून भारतीय चंद्रयानाचा सोहळा पाहिला तो अभिमानास्पद आहेच. मात्र आनंद सोहळ्यात इंडिया चंद्रावर पोहोचला जेवढा आनंद त्यांना आहे. तेवढाच गर्व भारतीयांनाही आहे. मोदी हे बाहेरील देशातून आल्यानंतर त्यांनी तत्काळ इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. इंडिया, इंडिया असा गौरव ते करतात. मात्र त्याच इंडियात नर्गिस बानो मणिपूर घटना घडते तेव्हा मात्र मोदी तेथे जात नाहीत. मोदी हे घमेंडी आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
हिंगोलीतील गद्दार नागाला दूध पाजले!
27 जुलै रोजी हिंगोली येथे उद्धव ठाकरे यांच्या पार पडलेल्या सभे दरम्यान उपस्थित विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह अनेकांनी कळमनुरीचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले सध्या श्रावण सुरू असून श्रावणातील उद्या दुसरा सोमवार आहे. कोणतीही भक्ती काही न करता महादेव शंभूची हिंगोलीवर कृपादृष्टी आहे. जिल्ह्यात वरून राजा बरसत असून हा वरून राजा राज्यावरही बरसावा असे साकडे मी महादेवास घालतो असे सांगून हिंगोलीतील गद्दार आमदाराने कावड यात्रेचे काय बॅनर लावले आहेत. कावड यात्रेतून पवित्र जल महादेवावर सोडावे लागते. तेव्हा तुम्ही पवित्र आहात का? तुमची शुद्धी व्हावी लागेल असे सांगत आताच नागपंचमीचा सण झाला. नागपंचमीला नागाला दूध पाजले जाते. आम्ही हिंगोलीतील गद्दार नागाला दूध पाजले… दुधच नाही तर त्याच्यापुढे बीनही वाजवली; मात्र हा नाग आम्हालाच डसला अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.