मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्ह्यात यंदा विक्रमी वृक्ष लागवड होणार असून 73 लाख 41 हजार 200 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून यावर्षी सद्यस्थितीत 13 लाख 60 हजार रोपे उपलब्ध आहेत. त्यामुळे विविध झाडाच्या बियांचे संकलन करुन सीड बँक तयार करावी व या सीड बँकेतून उपलब्ध बियांचा वापर करुन वृक्ष लागवड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात वृक्ष लागवडीची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, समाधान घुटुकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी वन विभाग 5 लाख 79 हजार, सामाजिक वनीकरण विभाग 1 लाख 66 हजार, रेशीम विभाग 6 लाख, नगर पालिका प्रशासन विभागाकडून 15 हजार याप्रमाणे 13 लाख 60 हजार रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
उर्वरित वृक्ष लागवडीसाठी लागणाऱ्या आवश्यक बियांचे संकलन करण्यासाठी शिक्षण विभाग, वन विभाग, जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीतील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहायक, आशाताई, शिक्षक, विद्यार्थी यांना बियांचे संकलन करण्यासाठी उद्दिष्ट ठरवून द्यावेत.
यासाठी स्वयंसेवी संस्थांनाही (एनजीओ) सहभागी करून घ्यावे. वृक्ष लावगवडीसाठी जागानिश्चिती व खड्डे तयार करण्याचे काम वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.
यावेळी बैठकीस वन विभाग, सामाजिक वनीकरण, महसूल, कृषि, रेशीम विभागासह संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.