मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जगात कोणत्याही देशात भारतात सापडतील एवढ्या जाती अस्तित्वात नाहीत. कारण जातीमध्ये गुलामीची मुळे खोलवर रुजविण्यात आलेली आहेत आणि ही मुळे स्त्रियांच्या पोटातून जन्म घेतात. त्यामुळे स्त्रियांवर विविध बंधने घालण्यात आलेली आहेत. ही बंधने जुगारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत वैशाली डोळस यांनी हिंगोली येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेत केले.
क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा हिंगोली व मातंग समाजाच्या वतीने दिनांक 27 ते 29 जानेवारी या दरम्यान आद्य क्रांती लहुजी साळवे स्मृती साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला 2024 चे आयोजन करण्यात आले होते.
हिंगोलीतील स्व. शिवाजीराव देशमुख सभागृहात सदरील व्याख्यानमाला पार पडली. व्याख्यानमालेच्या तृतीय पुष्पात स्व. यशोदाताई कोरडे विचार मंचावर ‘बहुजन समाजातील अंधश्रद्धा आजचे स्त्री जीवन आणि भविष्यातील आव्हाने’ या विषयावर प्रसिद्ध विचारवंत वैशाली डोळस यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन अखिल भारतीय मातंग समाज महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुसुमताई गोपले यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षिका शोभाताई धुमाळ या उपस्थित होत्या. विचार मंचावर मराठा सेवा महासंघ महिला आघाडीच्या सीमा मुळे, राधिका चिंचोलीकर, लक्ष्मीबाई उफाडे यांची उपस्थिती होती.
यावेळी तृतीय पुष्पगुंपताना प्रसिद्ध विचारवंत वैशाली डोळस म्हणाल्या की, भारतातील मनुस्मृति पितृसत्ताक व्यवस्थेने स्त्रियांवर अनेक बंधने लादली. ही बंधने संविधानाने मोडीत निघाली असली तरी धार्मिक बंधनातून आणि परंपरांमधून वेळोवेळी डोके वर काढते असे सह उदाहरण देऊन स्पष्ट केले भारतीय स्त्रियांना गुलामांचेही गुलाम म्हणून वागवले. तसेच त्यांना माणूस म्हणून नाकारण्यात आले.
या मनुवादी जातीय उतरंडीच्या समाज व्यवस्थेत क्रांतिकारक ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची शिष्या मुक्ता साळवे यांनी आमचा धर्म कोणता हा निबंध लिहून प्रस्थापितांना प्रश्न विचारला त्यांचे पुढे काय झाले हे आपणा कोणालाही माहीत नाही. मुक्ता साळवे यांचा शोध आपण घेतला पाहिजे.
तसेच महिलांनी वाचन केले पाहिजे. त्यांनी स्वतःचा शोध घेतला पाहिजे. भारतीय पितृसत्ताक पद्धतीने महिलांवर अनेक बंधने लादली. महिलांना त्यांचा पती निवडता येऊ नये म्हणून बालविवाह पद्धती रुजविण्यात आली. तसेच विधवा महिलांचे अधिकार नाकारण्यात आले. या महिलांना समाजात कुठेही स्थान देण्यात आले नाही.
कारण या महिलांनी जातीच्या बाहेरील व्यक्तीबरोबर लग्न केले तर हा प्रश्न येथील वर्ण व्यवस्थेला कायम भेडसावत आलेला आहे. जगात कोणत्याही देशात सापडणार नाहीत एवढ्या जाती भारतात आहेत आणि गुलामीची मुळे ही या जात व्यवस्थेत आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवले आहे की, भारतीय वर्ण व्यवस्थेत जात ही महिलांच्या गर्भातून अस्तित्वात येते. त्यामुळे महिलांचे अधिकार नाकारण्यात आले.
आज स्वातंत्र्यानंतरच्या महिला टीव्हीवरील मालिका, कोणत्या ना कोणत्या मंदिराच्या प्रदक्षिणा आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये रममान झालेल्या आहेत. त्यांना असे खिळवून ठेवण्यात ब्राह्मण व्यवस्था यशस्वी होताना दिसते. भारतीय जातीय व्यवस्थेत महिलांना एकीकडे विधवेनंतर पुनर्विवाह नाकारण्यात आला तर दुसरीकडे पुरुषांबाबत मात्र पुनर्विवाह परवानगी देण्यात आली, असे सांगितले.
तसेच आताही विवाह वेळी मुलगा केवळ मुलीचे शरीर, सौंदर्य पाहतो तर मुलगी आणि मुलीकडील मंडळी हे मुलाचे शिक्षण त्याचा व्यवसाय नोकरी घर पाहतात. तसेच त्याची कमावण्याची अवकात आहे की नाही हे पाहिले जाते. त्याचा पुरुषार्थ पाहिला जातो. कारण जात व्यवस्थेने त्यांना माणूस म्हणून मान्य केलेले आहे.
ही गंभीर बाब असून महिलांनी पुस्तके वाचावीत. आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी. मुलींनी जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभे राहता येत नाही तोपर्यंत विवाह करू नये तसेच किमान पदवीपर्यंतचे तरी शिक्षण घ्यावे असेही त्यांनी सांगितले. आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली पाहिजे. संविधानाने स्त्री-पुरुष समानता दिली.
मात्र किचन पासून संसदेपर्यंत अशी समानता अद्याप आलेली नाही, असे सांगतानाच त्यांनी महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण देण्याचे गाजर सरकारने दाखवले आहे. हे गाजर हळदीकुंकवाच्या कार्यक्रमातील गाजराप्रमाणेच असल्याचे सांगितले. महिलांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात चमच – ताटल्या वाटत न बसता आपल्या हक्क अधिकारासाठी झगडले पाहिजे तसेच विविध क्षितिजे पदांक्रात केली पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अखिल भारतीय मातंग समाज महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुसुमताई गोपले मराठा सेवा संघ महिला आघाडीच्या सीमा मुळे यांची ही भाषणे झाली तसेच सेवानिवृत्त शिक्षिका शोभाताई धुमाळ यांचे अध्यक्षीय भाषण पार पडले शोभाताई धुमाळ यांनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुढील व्याख्यानमालेसाठी आपण 50 हजार रुपयांची मदत देऊ असे जाहीर केले. त्यामुळे त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक करून त्यांचा भव्य सत्कारही करण्यात आला.
यावेळी स्व. शिवाजी राव देशमुख सभागृह तुडुंब भरले होते. महिलांची लक्षणीयरीत्या उपस्थिती होती. कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे आत्माराम गायकवाड तसेच मुख्याध्यापक हरिभाऊ सोनुने यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच मार्मिक महाराष्ट्र समूहाचे मुख्य संपादक गजानन जोगदंड, पत्रकार दिलीप हळदे, मनीष खरात यांचा शाल, हार घालून व स्मृतिचिन्ह देऊन प्रसिद्ध विचारवंत वैशाली डोळस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा हिंगोली यांच्यासह मातंग समाज बांधवांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.