मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील नगर परिषदेच्या शासनमान्य विकास आराखड्यात उद्यानासाठी आरक्षित असलेला सर्वे नंबर 90 सिटी सर्वे नंबर 3566 हा भूखंड हिंगोली नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या नावे हस्तांतरित करावा, अशी मागणी हिंगोली येथील सकल मातंग समाजाच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोपानराव पाटोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हिंगोली शहराची लोकसंख्या 75 ते 80 हजाराच्या जवळपास आहे. या लोकसंख्येच्या प्रमाणात शहरातील नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी हवे तसे उद्यान शहरात उपलब्ध नाही. देवडा नगर भागात फक्त एकच उद्यान आहे. याव्यतिरिक्त शहरात इतरत्र कोणत्याही ठिकाणी बागबगीच्या उद्यान नाही.
हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी शासनमान्य विकास आराखड्यात उद्यानासाठी आरक्षित असलेली साईट क्रमांक 72 सर्वे नं. 90 सीट सर्वे नं. 3566 हा भूखंड विकसित करण्यासाठी विनामूल्य ताबा या कार्यालयास मिळण्यासाठीचा प्रस्ताव 3 डिसेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या कार्यालयात दाखल केलेला आहे; परंतु आजपर्यंत सदरील भूखंड हा नगरपरिषदेच्या मालकी ताब्यात वर्ग करण्यात आलेला नाही.
शासन निर्णय क्रमांक जमीन 10 / 2005 / प्र. क्र. 38 / ज- 1 दि. 07/03/2006 या संदर्भीय शासन निर्णयानुसार शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा हिंगोली नगरपरिषद यांना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदरील निवेदन सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोपानराव पाटोडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने हिंगोली येथील सकल मातंग समाज उपस्थित होता.
15 वर्षांपासून सदरील भूखंड अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा स्वीकृत समाजाच्या ताब्यात
हिंगोली येथील सर्वे नंबर 90 सिटी सर्वे नंबर 3566 जुने सामान्य रुग्णालय अंबिका टॉकीज च्या बाजूस हा भूखंड मागील 15 वर्षांपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा स्वीकृत समाजाच्या ताब्यात आहे. या ठिकाणी उद्यान व सुशोभीकरणासाठी नगरपरिषद हिंगोली च्या नावे सदरील भूखंड हस्तांतरित करून मातंग समाजाची अस्मिता असलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सद्यस्थितीत असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी उद्यान उभारून सुशोभीकरण करावे व यासाठी सदरील भूखंड हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी सकलमातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.