मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :-
सेनगाव – सकल मातंग समाजाच्या वतीने आपल्या प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी आज 18 जुलै रोजी भर पावसात सेनगाव येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
सेनगाव तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने आज 18 जुलै रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी आपल्या प्रलंबित मुख्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर पावसात सेनगाव येथील तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
यामध्ये अनुसूचित जाती / जमाती आरक्षणाचे ‘अ’ ‘ब’ ‘क’ ‘ड’ असे वर्गीकरण करण्यात यावे.
महाराष्ट्रात बार्टीच्या धरतीवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था (आर्टी) ची स्थापना करण्यात यावी.
राज्यात मातंग समाजावर होत असलेला अन्याय व अत्याचार त्वरित थांबवून त्यांना संरक्षण द्यावे रमाई घरकुल आवास योजनेमध्ये मातंग समाजाला जास्तीत जास्त लाभ देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह सेनगाव येथील तसेच तालुक्यातील विविध गावांमधील मातंग समाज बांधवांच्या स्मशानभूमीचा व सभागृहाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने सकल मातंग समाज बांधवांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे भर पावसात आपल्या प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी सकल मातंग समाज बांधवांनी हे धरणे आंदोलन केले.
आंदोलनास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पाठिंबा
सकल मातंग समाजाच्या वतीने सेनगाव येथील तहसील कार्यालयात आज 18 जुलै रोजी भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा पाठिंबा असल्याचे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी सांगत या आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच मातंग समाजाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.