मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर, हिंगोली – येथील आयुक्त कार्यालयात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागीय पुरस्काराचे वितरण विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हिंगोली तालुक्यातील उमरा या गावास डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता हा विशेष पुरस्कार देण्यात आला.
यावेळी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी सांगितले की, गावशिवाराची स्वच्छता, जलसंधारण, शिक्षण, शाश्वत शेती, आरोग्य आदी सोयींमुळे गावांचे स्वरूप बदलू लागले आहे. स्वच्छ गाव, पाणीदार गाव, वनसंपदेचे गाव, आदर्श गाव अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत.
गावांचा सर्वांगिण विकास करताना निसर्ग रक्षण, पर्यावरणाला हानी न पोचवता गावशिवाराची जैवविविधता अबाधित ठेवावी लागणार आहे. स्वंयपूर्ण गावांसाठी शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच गावातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग महत्वाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय स्तरावरील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन 2020-21 व 2021-22 या वर्षातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता व विशेष पुरस्कार वितरण विभागीय आयुक्त श्री. अर्दड यांच्या हस्ते झाले. यावेळी विभागीय विकास उपायुक्त सुरेश बेदमुथा, सहाय्यक आयुक्त सिमा जगताप उपस्थित होते.
पुरस्कार वितरण कार्यक्रमात संवाद साधतांना विभागीय आयुक्त अर्दड म्हणाले की, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता चळवळ उभी राहिली आणि ती आजही अविरतपणे सुरू आहे. या अभियानाची दखल देशाने घेतली आहे.
अभियानाच्या माध्यमातून गावांमध्ये वैयक्तिक, सार्वजनिक, शालेय स्वच्छता विषयक उपक्रम राबविले जात असून मोठ्या प्रमाणात लोकसहभागाच्या माध्यमातून विकास कामे केली जात आहेत, हे उल्लेखनीय आहे. यापुढेही गावातील प्रत्येक घटकाचा सहभाग घेत स्वंयपूर्ण गावांसाठी प्रत्येकाने यामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
दिव्यांग बांधवापासून ते वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत, गावागावात या योजनांचा लाभ या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न गरजेचे आहेत. प्रत्येकाने आपल्या गावात लोकसहभागातून विकास कामे केली तर ही विकासकामे राज्यातील इतर गावांनाही दिशादर्शक ठरतील.
आपण नैसर्गिक स्त्रोताचा जबाबदारीने वापर केला पाहिजे, त्याचा विनाश न करता ते पुढच्या पिढीला उपयुक्त ठरतील, त्यासाठीचे प्रयत्न महत्वाचे आहेत. गावांचा विकास करताना निसर्ग जपण्यासोबतच सेंद्रिय शेतीकडेही वळावे. गावाला सुजलाम-सुफलाम करूया, असे आवाहन विभागीय आयुक्त आर्दड यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय विकास उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी केले. त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, ग्रामविकासात पथदर्शी कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर या अभियानांतर्गत पुरस्कार दिले जातात.
मराठवाडयात या अभियानात विशेष कामगिरी केलेल्या गावात पाण्याचा काटकसरीने वापर, मोठया प्रमाणात वृक्ष लागवड, प्लॅस्टीकमुक्त गाव अशा बदलासह बदलते गाव पहायला मिळते आहे. काही गावांनी अनेक वर्षापासून हे सातत्य कायम ठेवले आहे.
कार्यक्रमाचे आभार सहाय्यक आयुक्त (विकास) सिमा जगताप यांनी मानले. कार्यक्रमात लाडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री बागड व हाडोळी ग्रामपंचायतीचे सरपंच माधवराव अमृतवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
विभागीय पातळीवरील पुरस्कार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम प्रथम पुरस्कार (विभागून) रू.10 लक्ष
जवळगाव, ता. हिमायतनगर जि.नांदेड
हाडोळी, ता.भोकर, जि.नांदेड
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम द्वितीय पुरस्कार (विभागून) रू.8 लक्ष
भडंगवाडी, ता.गेवराई, जि.बीड
नळगीर, ता.उदगीर जि.लातूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम तृतीय पुरस्कार (विभागून) रू.6 लक्ष
कंडारी, ता.बदनापूर, जि.जालना
ब्राम्हणगाव ता.जि.परभणी
विशेष पुरस्कार स्व.वसंतराव नाईक पुरस्कार सांडपाणी व्यवस्थापन
मस्साजोग ता.केज, जि.बीड.
विशेष पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता
उमरा, ता.जि.हिंगोली.
विशेष पुरस्कार स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार शौचालय
लाडगाव, ता.जि.छत्रपती संभाजीनगर