महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – सध्या उन्हाळा सुरू असून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत, मात्र बालकांसाठी अंगणवाड्या सुरू आहेत खेरडा येथील जि. प. शाळेचे गेट बंद करण्यात आले आहे. शाळेच्या परिसरात असलेल्या अंगणवाडीत जाण्यासाठी बालकांना गेट चढवून अंगणवाडीत जावे लागत आहे. या सर्व प्रकाराकडे एकात्मिक महिला व बालकल्याण विकास अधिकाऱ्यांसह शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
इयत्ता पहिली पासूनच्या विद्यार्थ्यांना उन्हाळा लागला की सुट्ट्यांचे वेध लागते. सुट्ट्यांमध्ये कोणी मामाच्या गावी तर कोणी ‘समर कॅम्प’ ला निघून जातात तर अनेक जण आई-बाबांसोबत आनंद साजरा करतात. उन्हाळी सुट्टी लागली तरी अंगणवाडीतील बालकांना त्यांच्या शारीरिक विकासासह बुद्धिमत्ता विकासासाठी अंगणवाडीत पाठविले जाते अंगणवाड्या सध्या अनेक ठिकाणी सुरू आहेत.
हिंगोली तालुक्यातील खेरडा जि. प. शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. या शाळा परिसरात अंगणवाडी आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे 1 मे पासून मुख्याध्यापकांनी शाळेचे गेट बंद केले आहे.
मात्र शाळेचे गेट बंद करताना गेटची चावी अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे बालकांना अंगणवाडीत जाण्यासाठी शाळेचा गेट चढवून जावे लागत आहे. असा गेट चढताना एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
या प्रकाराकडे एकात्मिक महिला व बाल कल्याण विकास अधिकाऱ्यासह शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शाळेचा गेट उघडण्याबाबत संबंधित मुख्याध्यापकास कळवावे अशी मागणी पालकांतून केली जात आहे.