मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील आगारात एकाचालकाचा मृतदेह 6 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगारात मागील काही वर्षांपासून कार्यरत असलेले चालक एस. एस. सलामे (ह.मु. रीसाला बाजार हिंगोली) हे 5 ऑक्टोबर रोजी हिंगोली – लातूर या बसवर कर्तव्य बजावत होते.
लातूरहून हिंगोली कडे परतत असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांनी गंगाखेड येथे दवाखान्यात एक तास उपचार घेतला त्यांना डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले होते, असे समजते.
उपचार घेतल्यानंतर गंगाखेड वरून हिंगोली येथे रात्री अंदाजे साडेआठ ते 9 वाजेच्या दरम्यान ते हिंगोली येथील आगारात आले. आगारातील स्टॉक रूममध्ये ते काही कामानिमित्त गेले असता त्यांना तेथेच हृदयविकाराचा झटका आला असावा असे बोलले जात आहे.
मात्र रात्री 9 वाजेपासून चालक सलामे हे या रूममध्ये होते हे कोणाच्याच कसे लक्षात आले नाही हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यांना किती वाजता हृदयविकाराचा झटका आला की आणखी काही होते हे शिवविच्छेदनानंतरच समजू शकेल.
तूर्त त्यांचा मृतदेह हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवाविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे असे समजते.
एका महिन्यावर होते मुलीचे कर्तव्य
हिंगोली येथील आगारात कार्यरत असलेले एस एस सलामे यांना एक मुलगा एक मुलगी असे अपत्य आहेत. त्यांच्या मुलीचे लग्न पुढील महिन्यात होणार होते. त्यासाठी त्यांनी बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता असे समजते. सलामे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनाने सहानुभूतीपूर्वक त्यांच्या कुटुंबीयास मदत करावी, अशी मागणी देखील होऊ लागली आहे.