शारदीय नवरात्रोत्सव – संतोष अवचार
शारदीय नवरात्र उत्सवात आज देवीची सहावी माळ… वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरातील टोकाई गडावरील टोकाई मातेचा मार्मिक महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक संतोष अवचार यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट…
वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात अजिंठा डोंगर रांगांमधील टोकाई गड हा हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे…
या ठिकाणी असलेल्या दीडशे एकर गायरान जमिनीवरील 25 एकर मध्ये टोकाई गेवराई सह्याद्री फाउंडेशन च्या वतीने येथे वृक्षारोपण करून जैवविविधतेचे संरक्षण केले जात आहे…
या ठिकाणी टोकाई गडावर टोकाई टोकाई माता विराजमान आहे असे म्हणतात.. या मातेची स्थापना छत्रपती शहाजी महाराज यांनी केली..
छत्रपती शहाजी महाराज हे देवगिरी गडावरून हैदराबाद येथे जाताना टोकाई गडावर आवर्जून थांबत.. पावसाळ्यात टोकाई गडावरून गोदावरी आदी नद्यांना पूर आहे का हे टोकाई गडावरून पाहिले जात असे…
गडावरून या नद्यांना पूर असेल तर गडावर किंवा हिंगोली येथे छत्रपती शहाजी महाराज व त्यांचे सैन्यदल थांबत असे, असे म्हटले जाते.. या गडावरून सायंकाळच्या वेळी नांदेड आणि वसमत ही शहरे दिसतात असे म्हटले जाते…
टोकाई गडाच्या पायथ्याला बारव असून ही बारव शिवकालीन आहे… छत्रपती शहाजी महाराज यांच्या सैन्य दलातील अश्वांना पाण्याच्या उपलब्धतेसाठी ही बारा उभारण्यात आल्याची सांगितली जाते…
टोकाई गडावर छत्रपती शहाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या टोकाई मातेसह चंद्रपूरची आई, तुळजाभवानी माता, रेणुका माता, जगदंबा माता, अशा सात मातांच्या मुर्त्या येथे आहेत… सदरील मुर्त्या ह्या दगडाच्या आहेत. मात्र, त्यांची महिमा आणि त्यांच्यावरील भाविकांच्या मनातील श्रद्धा अपार आहे…
टोकाई मातेच्या दर्शनासाठी हिंगोली जिल्ह्यासह मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त येथे येतात देवीची ख्याती नवसाला पावणारी अशी आहे… त्यामुळे दर्शनासाठी येथे बाराही महिने भाविक गर्दी करतात…
सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. यानिमित्त टोकाई मातेच्या दर्शनासाठी पहाटे 3 वाजेपासून येथे रांगेत उभे राहून भाविक भक्त शांततेत दर्शन घेत आहेत…
दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर संस्थान कडून फराळ, चहा – पाण्याची सोय केली जात आहे.. मंदिराचा परिसर एक एकरचा असून मंदिराचा विकास करण्यात आलेला आहे..
टोकाई गेवराई सह्याद्री फाउंडेशन च्या वतीने येथे मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या वृक्ष लागवडीने टोकाई गडाचा परिसर हिरवळीने नटून गेला आहे…
टोकाई गडाच्या सर्वंकष विकासासाठी टोकाई गेवराई फाउंडेशन मित्र मंडळ अहोरात्र येथे मेहनत घेत आहे…
‘ती’ आख्यायिका मोडीत निघाली
टोकाई गड आणि परिसरात वृक्ष लागवडी पूर्वी या गडावर कोणीही थांबल्यास थांबणारा व्यक्ती हा रात्रीतून गडाच्या पायथ्याशी येतो, अशी आख्यायिका होती. मात्र, टोकाई गेवराई सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. यानिमित्त येथे फाउंडेशनचे पदाधिकारी थांबतात. मात्र, त्यांना अद्याप असा कोणताही अनुभव आला नाही. त्यामुळे सदरील आख्यायिका मोडीस निघाली, असे या फाउंडेशनचे अध्यक्ष मंगेश दळवी यांनी सांगितले.