मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरातून जाणाऱ्या नांदेड राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कडून काही महिन्यांपूर्वी उड्डाणपूल साकारण्यात आला आहे. सदरील उड्डाण पुलावर सुरक्षा कठडे आणि डांबरीकरण यामध्ये फटी निर्माण होऊन अनेक ठिकाणी पुलावरील रोड खाली सरकला आहे. त्यामुळे हा पूल रहदारीस एक प्रकारे धोकादायक ठरला आहे. यासंदर्भात ‘मार्मिक महाराष्ट्र’ मध्ये 16 जुलै रोजी वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन अंदाजे दोन ते तीन वेळा सदरील उड्डाणपूल रहदारीस बंद करण्यात आला होता. त्यानंतर आता मागील काही दिवसांपासून उड्डाणपुलावरील डागडुजी केली जात आहे.
हिंगोली शहरातून नांदेड जाणाऱ्या महामार्गावरील नूतन उड्डाणपुलाने शहराच्या सौंदर्यकरणात भर घातली खरी मात्र हा उड्डाणपूल देखावाच ठरू लागला आहे. सदरील उड्डाणपुलाचे काम जेवढ्या धिम्या गतीने करण्यात आले तेवढेच निकृष्ट देखील झाल्याचे दिसते.
सदरील उडान पुल रहदारी सुरू होऊन अवघे काही महिने झालेले आहेत. दोन ते तीन महिन्यातच सदरील विधान पुलावरील संरक्षण कठडे आणि उड्डाणपुलावरील डांबरीकरणाच्या रोड यामध्ये फटी निर्माण होऊन अनेक ठिकाणी डांबरीकरणाचा रोड खाली गेला आहे.
संरक्षण कठड्यापासून काही इंच हा रोड खाली गेला आहे. यावरूनच रोडच्या दर्जाबाबत अंदाज बांधता येईल.. उड्डाणपुलाच्या या निकृष्ट बांधकामाने भविष्यात एखादी दुर्घटना होण्याची भीती आहे.
नूतन उड्डाणपुलाच्या या अवस्थेबाबत ‘मार्मिक महाराष्ट्र’ मध्ये 16 जुलै 2023 रोजी ‘निकृष्टतेचा उत्कृष्ट नमुना! नूतन उड्डाण पुलाच्या सुरक्षा कठड्यांपासून डांबरीकरण तुटले; जागोजागी निर्माण झाल्या फटी!!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते.
सदरील वृत्ताची महाराष्ट्र शासन आणि संबंधितांनी दखल घेऊन हा पूल दोन वेळा रहदारीस बंद केला होता. त्यानंतर आता मागील काही दिवसांपासून पुलावरील डागडूजी केली जात आहे.