मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – यंदा जिल्हाभरात 30 मार्च रोजी श्रीराम नवमी साजरी केली जाणार आहे. यानिमित्त कुठेही अनुचित घटना घडू नये तसेच हा उत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी हिंगोली पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
30 मार्च रोजी हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात श्रीराम नवमी उत्सव साजरा होणार आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्हा पोलीस दलाने खबरदारीचा उपाय म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे दोन प्लाटून, गृहरक्षक दलाचे 400 पुरुष व 5 महिला तसेच जिल्हा पोलीस दलाचे 60 पोलीस अधिकारी व 401 पोलीस अंमलदार यांचा समावेश केला आहे.
हिंगोली पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांनी कायदेशीररित्या परवानगी घेऊन पोलीस दलातर्फे दिलेल्या सूचनांचे परिपूर्ण पालन करून शांततेत श्रीराम नवमी उत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच पोलिसांमार्फत दिलेल्या निर्देशांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे डॅशिंग जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले आहे.