मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र नर्सी येथे कार्तीक प्रबोधिनी एकादशीला संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 753 वा जन्मोत्सव सोहळा ता.२३ नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात पणत्या पेटवून साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त नामदेव मंदिर संस्थान व परिसरातील भाविकांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते.
श्रीसंत नामदेव महाराज यांच्या 753 व्या जयंतीनिमित्त मंदिर परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीतील संत नामदेव महाराज मूर्तीचे राजश्रीताई हेमंत पाटील यांनी दर्शन घेतले. तसेच महिला वारकऱ्यांसह पालखीमध्ये सहभागी होत, टाळ मृदंगाच्या गजरात विठू – नामाचा जयघोष केला.
मंदिर संस्थांच्या वतीने हिंगोली लोकसभा खासदार हेमंत पाटील यांच्या अर्धांगिनी राजश्रीताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मंदिर संस्थांचे पदाधिकारी द्वारकादास सारडा, भिकाजी कीर्तनकार, भागवत सोळंके, पिंटू गुजर, दामूअण्णा झाडे, रामेश्वर शिंदे, वसंतराव अवचार, सिताराम पवार, भिकुलाल बाहेती, भिकूलाल कदम, एडवोकेट मनोज आखरे, डॉक्टर राहुल नाईक यांच्यासह वारकरी मंडळी व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
श्री संत नामदेव मंदिर व घाट परिसरात दीपोत्सव साजरा
श्रीसंत नामदेव महाराज यांचा जन्मसोहळा साजरा करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळ पासूनच मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात तसेच घाट परिसरात शेकडो पणत्या पेटवून दिपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मंदिरामध्ये फुलातून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी संत नामदेव जन्मोत्सव सोहळ्याला नर्सीसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या जय घोषाने दुमदुमला होता. मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या संख्येने मांदियाळी जमली होती.