मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा द्यायला हवा. असे झाले तर मी हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेवर शिवसेनेचा, छत्रपतींचा कोरा करकरीत भगवा फडकविला शिवाय राहणार नाही, असा विश्वास कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संतोष (दादा) बांगर यांनी हिंगोली येथे आढावा बैठकीत दिला.
16 जुलै रोजी आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या नेतृत्वात तसेच मुंबई येथून आलेले प्रशांत काळे, विशाल पावसे व मनोज बेळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी बोलताना आमदार संतोष (दादा) बांगर म्हणाले की आम्ही हिंदुहृदयसम्राट सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक असून आम्ही ठाकरे घराण्याशी आधीही एकनिष्ठ होतो, आताही आहोत आणि यापुढेही राहू. आमची मातोश्रीवरील निष्ठा तसुभर देखील ढळणार नाही. तसेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठीच मी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आणि हे बंड नसून हा उठाव आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा द्यायला हवा. असे झाले तर मी हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेवर शिवसेनेचा, छत्रपतींचा कोरा करकरीत भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आमदार संतोष (दादा) बांगर यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
यावेळी बोलताना कळमनुरी तालुक्यातील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक संभाजीराव कराळे म्हणाले की, आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून शिवसेना पक्ष उभा केलेला आहे आणि तो पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दावनीला बांधलेला आम्ही सहन करणार नाही. म्हणून आम्ही आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या सोबत आहोत.
तसेच कळमनुरीचे माजी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे म्हणाले की हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक हे राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत जाऊ शकत नाहीत असे सांगितले. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.