मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :-
सेनगाव – तालुक्यात 29 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने भानखेडा येथील शेतकऱ्याच्या सोलार प्लेटचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे सदरील शेतकरी अडचणीत सापडला असून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात 27 नोव्हेंबर पासून अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच पावसादरम्यान सोसाट्याचा वाराही सुटत आहे. 29 नोव्हेंबर रोजी सेनगाव तालुक्यातील भानखेडा परिसरात पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या वादळी वाऱ्याने भानखेडा येथील शेतकरी पांडुरंग काशीराम कोटकर यांच्या सोलार प्लेटचे मोठे नुकसान झाले आहे.
पांडुरंग कोटकर यांना सदरील सोलार प्लेट ह्या प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेतून जीके एनर्जी मार्केटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून त्यांच्या शेतात लावण्यात आलेले आहेत.
लावण्यात आलेल्या सोलार प्लेट पैकी वादळी वाऱ्याने व झालेल्या जोरदार पावसाने दोन सोलार प्लेट वाकल्या आहेत. त्यामुळे सदरील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून विंधन विहिरीचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.
परिणामी सदरील शेतकऱ्यास त्याच्या शेतातील पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पांडुरंग कोटकर या शेतकऱ्याने केली आहे.