मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – समस्याग्रस्त पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे व त्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळण्यासाठी महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.
महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर महिलांसाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी आज दि. 18 मे, 2023 रोजी हिंगोली व कळमनुरी तहसील कार्यालयात तसेच औंढा व वसमत येथील पंचायत समिती कार्यालयात संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर “स्त्री शक्ती समाधान शिवीर’’आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी हिंगोली तालुक्यातून 120 अर्ज, वसमत तालुक्यातून 73 अर्ज, औंढा नागनाथ तालुक्यातून 159 अर्ज व कळमनुरी तालुक्यातून 78 अर्ज अशा एकूण 430 महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते.
या प्राप्त अर्जातून हिंगोलीचे 42, औंढा नागनाथचे 20 व कळमनुरीचे 30 अशा एकूण 92 महिलांच्या समस्या तात्काळ सोडविण्यात आल्या आहेत.
हिंगोली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी गणेश वाघ, तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी बोथीकर, तालुका कृषि अधिकारी सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी आर. आर. मगर उपस्थित होते.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बाल कल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर, संबंधित तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सहकार्य केले.