मार्मिक महाराष्ट्र चम्मू / हिंगोली :-
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी च्या 83 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. पाऊस एक ठोकही झालेला नसताना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसावर खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. सदरील पिके पाण्याअभावी आता मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 83 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. 100 मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागासह जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.
असे असले तरी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अत्यल्प झालेल्या पावसावर खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. विशेष म्हणजे सदरील पाऊस हा एक ठोक पडलेला नसताना अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या करण्यास सुरू केले.
यंदा हिंगोली जिल्ह्यात उन्हाळ्याचे तापमान 47 अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते. परिणामी झालेल्या अत्यल्प पावसाने जमिनीची धूप योग्य प्रमाणात शमलेली नाही. अशातच शेतकऱ्यांनी पेरण्यांसाठी लगबग सुरू केल्याने पेरलेले सर्व मातीत मिळण्याची दाट शक्यता आहे.
पेरण्या करण्यामागे अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडे शेतात पांदण रस्ता नाही, मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास ट्रॅक्टर शेतापर्यंत जाणार नाही, असे कारण देत पेरण्या उरकल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या पेरण्या मातीत जाण्यास पांदण रस्ते हेही कारणीभूत ठरल्याचे यावरून दिसते.
जिल्ह्यात सर्वाधिक पेरण्या औंढा नागनाथ तालुक्यात झाल्या असून एकूण खरीप हंगामाच्या क्षेत्रफळापैकी 34 हजार 700 हेक्टर वर (53.37%) एवढ्या खरीप पेरण्या झाल्या आहेत. त्या खालोखाल सेनगाव तालुक्यात पेरण्या झाल्या असून 2150 हेक्टर (2.5%) एवढ्या पेरण्या झाल्या आहेत.
कळमनुरी तालुक्यात २८० हेक्टर (0.41%) क्षेत्रावर खरीप पेरण्या झाल्या असून हिंगोली तालुक्यात 24 हेक्टर (0.03%) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत तर वसमत तालुक्यात (0 टक्के) पेरण्या झाल्या आहेत.
सलग दोन-तीन दिवस पाणी पडल्यावरच शेतकऱ्यांनी पेरण्यांकडे वळावे
जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण सरासरीच्या 83 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. तसेच सदरील पाऊस हा सलग पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. सलग दोन ते तीन दिवस एकूण सरासरी 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात, असे आवाहन हिंगोली जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांनी केले आहे.