गमा
हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्याचा पदभार घेतल्यापासून धडाकेबाज कारवायांना सुरुवात झाली आहे.. कधी नव्हे एवढे उदयन्मुख ‘दादा’ सह अनेक जुन्या ‘ भाईना’ही जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.. तसेच अनेकांना स्थानबद्ध देखील केले आहे. त्यांच्या कार्यकाळातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई म्हणजे त्यांनी एका महिलेला एमपीडीए कायदा अंतर्गत एक वर्षासाठी केलेले स्थानबद्धतेची कारवाई… या कारवाहिनी त्यांनी स्त्री-पुरुष हे कायद्यासमोर समान आहेत असेच जणू अधोरेखित झाले… या कारवाईने समाजमन ढवळून निघाले आहे… त्यामुळे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे अभिनंदन पण त्यांनी केलेल्या या कारवाईने इतर ‘अनेकां’वरील कारवाया व्हाव्यात, अशी अपेक्षा आता अनेकांकडून व्यक्त होईल…
हिंगोली जिल्हा तसा मागासलेला जिल्हा मात्र जिल्ह्यात अनेक अवैध व्यवसाय चालतात अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सुरू केली आहे. त्यांच्या कारवाईच्या बडग्याने अवैध व्यवसाय करणाऱ्या व चालवणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडत आहे. कालच त्यांनी हिंगोली तालुक्यातील हिंगणी येथील दोघा आरोपींना सतत अवैध गौण खनिजाचे सतत गुन्हे करणाऱ्यांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
सतत विविध स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या अनेकांवर अशा प्रकारची कारवाई झाली आहे तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या व त्यांच्या वर्तनात कोणतेही बदल घडून न येणाऱ्या अनेकांना या कायद्याअंतर्गत तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले आहे.. त्यांच्या या कारवायांनी हिंगोली जिल्हा जणू गुन्हे मुक्त होऊ लागला आहे असे वाटू लागले आहे..
मात्र कोणता ना कोणता भाई किंवा दादा समोर येऊच लागला आहे मग आशा ‘दादां’ना पुन्हा हद्दपार केले जाऊ लागले आहे.. आता अजून किती ‘भाई’ आणि ‘दादा’ हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार होतील याबाबत कोणीही नेमकी आकडेवारी देऊ शकणार नाही..
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड्यातून काही दिवस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली जाऊ लागली आहे. तसेच व्यापक प्रमाणात धरपकड मोहीम राबविली जाऊ लागली आहे. यातून गुन्हेगार उजेडात येत आहेत तर काही गुन्ह्यांची पार्श्वभूमी नसणारेही काही गुन्ह्यात पुढे येऊ लागले आहेत.
यामध्ये वीशी पंचविशीतील तरुणांचा प्रामुख्याने सहभाग असलेला दिसतो. रोजगार उपलब्ध नसावा म्हणून हे तरुण वाम मार्गाला वळले असे आपण म्हणू पण अशिक्षितांचाही यामध्ये मोठा भरणा असलेला दिसतो. त्यामुळे विद्यमान नेतेमंडळींनी याकडे लक्ष देऊन जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीने काही मध्यम स्वरूपाचे का होईना प्रकल्प जिल्ह्यात आणण्याची गरज आहे. नाहीतर रोजगार नाही म्हणून अनेक तरुण विविध गुन्हेगारीकडे वळतील आणि त्यांच्यावर अशा प्रकारच्या कारवाया केल्या जातील. असो.
आपली भारतीय संस्कृती ही काही प्रमाणात मातृसत्ताक आहे असे आपण म्हणू… समाजात विविध स्त्री देवतांची मोठ्या भक्ती भावाने पूजाअर्चा केली जाते. तसेच विविध देवतांनी स्त्रियांचा मानसन्मान केला आहे याचे दाखले मिळतात.. श्रीकृष्णाने तर द्रौपदीचे वस्त्रहरण प्रकरणात द्रौपदीची अब्रू वाचविली होती…
भारताच्या इतिहासात स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे प्रत्येक वेळी श्रीकृष्ण द्रौपदीच्या मदतीला येऊ शकणार नाही..
स्त्रियांची भारतीय समाजातील स्थिती घटनाकारांना माहित होती म्हणून त्यांनी घटनेत त्यांच्या न्याय – हक्कासाठी विविध कायदे केले आणि कायद्यासमोर स्त्री-पुरुष हे समान आहेत हे नमूद केले.. याला पुष्टीच जणू हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी करून दिली.
इंदिरानगर हिंगोली येथे राहणाऱ्या या महिलेचा गुन्हा हा की ही महिला हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध हातभट्टी दारू विक्री करत होती महिलेवर तेरा गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींप्रमाणे ती समाज स्वास्थ्यास व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरू लागली.
त्यामुळे सदरील महिलेला पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर यांनी हिंगोली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी यांच्या मार्फतीने नमूद महिलेविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टी वाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981 एमपीडीएचे कलम 3(1) अन्वये कार्यवाहीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे सादर केला.
पोलीस अधीक्षक यांनी सदरील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रस्तावाची सविस्तर पडताळणी करून नमूद महिला ही सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरून धोकादायक व्यक्ती बनल्याने महिलेस एमपीडीए 1981 (सुधारणा 1996, 2009 आणि 2015) कलम 3 (2) अन्वये एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित निर्गमित केले.
महिलांना पुढे करून काही ऐतखाऊ अनेक अवैध व्यवसाय चालवतात तर काही प्रमाणात घरचा दादला कोणतेही काम करत नसल्याने महिला स्वतःहून अवैध व्यवसायाकडे वळतात असे चित्र काही चित्रपटातून अधोरेखित केले जाते.. सदरील चित्र काही ठिकाणी वास्तवात देखील असू शकते..
एका महिलेवर अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई! या कारवाईने अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या इतर महिलांमध्ये मोठी खळबळ उडाली असेल..पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे या कारवाईबाबत विशेष अभिनंदन… कायद्यापुढे स्त्री पुरुष हे दोन्ही समान आहेत हे अधोरेखित करून दिले. त्यांनी केलेल्या कारवाईने आता इतर अनेक अवैध व्यवसायांवर (हिंगोली शहरालगत राहोली फाट्याजवळ कुठेतरी अवैध वेश्या व्यवसाय चालतो अशी चर्चा होते) त्यावर देखील कारवाया व्हायला हव्यात ही अपेक्षा..
( श्रीधर शब्दाचा अर्थ भगवान विष्णूशी निगडित आहे आणि श्रीकृष्ण भगवान विष्णूचा अवतार आहे असे मानले जाते)