मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – सद्यस्थितीत शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या नोकरीची सुशिक्षित तरुणांना हुलकावणी मिळत आहे. शासनाकडून रिक्त जागा मागील कित्येक वर्षांपासून भरल्या जात नसल्याने तसेच नवीन जागाही काढून भरल्या जात नसल्याने बेरोजगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. नोकरी मिळत नसल्याने सुशिक्षित तरुण विविध व्यसनांच्या आहारी जाऊन स्वतःचे जीवन उध्वस्त करून घेताना चे दिसते. अशा या स्थितीत हिंगोलीतील 25 वर्षीय तरुणांनी खरमुरे विकण्याचा व्यवसाय थाटून आपल्या कुटुंबाचा उत्तम प्रकारे उदरनिर्वाह हा तरुण करत आहे.
आजची तरुण मुलं विविध क्षेत्रातील अभ्यास करून शासनाच्या नोकरीच्या भरोशावर अवलंबून राहतात, मात्र शासनाकडून मागील काही वर्षांपासून जुन्या रिक्त जागा भरल्या जात नसून नवीन जागा काढून त्याही भरल्या जात नसल्याने बेरोजगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. विविध शहरात सुशिक्षित तरुणांचे लोंढेच्या लोंढे बाहेर पडत असून रोजगाराचा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सुशिक्षित तरुणांना छोटा मोठा व्यवसाय करण्यात कमीपणा वाटतो. किंवा संकोच वाटतो म्हणून सुशिक्षित तरुण हे व्यवसाय करत नाहीत. यास काही अपवाद आहेत.
हिंगोली येथील भोईवाडा भागात राहणाऱ्या बजरंग पांडुरंग कांबळे या 25 वर्षीय तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची अशी होती. त्यामुळे त्यास शिक्षण घेता आले नाही. जनतेने सातवा वर्ग शिकलेल्या बजरंग यांनी आपल्या वडिलांचा खरमुरे विकण्याचा व्यवसायात वडिलांना हातभार लावण्याचे ठरवून तो या व्यवसायात शिरला. त्यांच्या वडिलांना आता काम होत नाही म्हणून ते घरीच असतात तर कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बजरंग हाच मार्गी लावतो. तो घरातील कर्ता पुरुष असून बजरंग हा खरमुरे, वाटाणे, मुरकुल, पापडी आदी आपल्या गाड्यावर घेऊन सकाळी घराबाहेर पडतो तो रात्री नऊ ते दहा वाजता घरी जातो.
बजरंग हा आपले खरमुरे घेऊन एनटीसी, नगरपरिषद कॉलनी, इंदिरा चौक, बस स्टॅन्ड आदी ठिकाणी घेऊन फिरतो त्याच्या खरमुऱ्याचा स्वाद अत्यंत चांगला असून कोणी एकदा खरमुरे खाणारा त्याच्याकडे वारंवार जाऊन खातो. त्यामुळे त्याचे खरमुरे रात्रीपर्यंत सर्वच विकतात सर्व खर्च कापून त्यास त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढे पैसे मिळतात असे तो सांगतो.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी तोंड देऊन अत्यंत प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करणारा हा तरुण कोणत्याही व्यसनाच्या आधीन गेलेला नाही हे आजच्या पिढीने त्याच्याकडून शिकण्यासारखी बाब आहे.