मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील रामलीला मैदानावर वसुंधरा फाऊंडेशनच्या वतीने तीन दिवसीय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामुळे रविवारी (ता.४) रोजी संयोजन समितीच्या वतीने मैदान साफसफाई, लाल माती टाकणे , प्रेक्षक गॅलरी आदीकामाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.
वसुंधरा फाऊंडेशनच्या वतीने येथील एका रामलीला मैदानावर दहा डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय कबड्डीचा महासंग्राम हिंगोलीकराना पहावयास मिळणार आहे.
1 डिसेंबर रोजी मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले ,त्यानंतर शनिवारी रन फॉर कबड्डीचा कार्यक्रम पार पडला आता क्रीडा प्रेमींना राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, संयोजन समितीचे समन्वयक कल्याण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान समितीचे प्रमुख विशाल शिंदे, सत्यप्रकाश नांदापुरकर, विकास जाधव , मधुकर सुतार, दिगंबर पारिसकर, संजू महाराज सरदार यांच्याकडूनकबड्डी मैदान तयार करण्याची जोरदार तयारी सुरू आहे.
याचप्रमाणे बारा थर असलेली गॅलरी उभारण्याचे काम , लाल माती आणून ती साफ करण्याचे कामही सुरू आहे. त्यानंतर संपूर्ण मैदानाची साफसफाई करून, पार्किंग व्यवस्था ,स्टेज तयार करणे आदी कामे सुरू आहेत.
या स्पर्धेत ग्रामीण भागातील दहा तर शहरी भागातील दोन असे एकूण बारा संघ तर राज्यातून पंधरा संघ सहभागी होणार आहेत.
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला केवळ पाच दिवस शिल्लक असल्याने नऊ डिसेंबर पर्यंत सर्व कामे पूर्ण करून दहा डिसेंबरला राज्यस्तरीय स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. शनिवारी झालेल्या कबड्डी रनवे मुळे स्पर्धेची जनजागृती झाली व या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जिल्हाभरात कबड्डीचा स्पर्धेचे वातावरण तयार झाले आहे.