मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
नवी दिल्ली – ‘स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढयाची सर्वसमावेशक कथा’ ही मालिका दुरचित्रवाणीवर दर रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत प्रसारित केली जाईल. या मालिकेचा पहिला भाग उद्या 14 ऑगस्ट 2022 पासून दाखविण्यात येणार आहे.
‘स्वराज – द होल स्टोरी ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल’ ही एक मेगा ऐतिहासिक लघुपट मालिका आहे . 15 व्या शतकापासून ते 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा निर्भीड, गौरवशाली इतिहास दूरदर्शनच्या माध्यमातून दाखविण्याला जाईल.
ही मालिका फक्त इंग्रजांनी केलेल्या अन्यायावर नाही तर डच, फ्रेंच, पोर्तुगीज वसाहतवाद्यांच्या विरोधात आवाज उठविलेल्या 75 ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांवर आधारित आहे. या मालिकेत राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे, मॅडम भिकाजी कामा, गणेश आणि विनायक सावरकर, नाना साहेब आणि बाजीराव पेशवे, तसेच राणी आबक्का, बक्षी जगबंधू, तिरोत सिंग, सिद्धो कांथो मुर्मू, यासारख्या सुप्रसिद्ध स्वातंत्र्यावीरांच्या गाथांचा समावेश असणार आहे. यासह शिवाप्पा नायक, कान्होजी आंग्रे, राणी गैदिनलिऊ, तिलका मांझी यांसारख्या कमी ज्ञात स्वातंत्र्यवीरांच्याही कथाही प्रसारित केल्या जातील.
ही मालिका 4K/HD सारख्या उच्च प्रणाली गुणवत्तेसह आणि विस्तृत संशोधनानंतर तयार केली गेली आहे. त्यामुळे याला ऐतिहासिक महत्त्वही आहे. लोकप्रिय चित्रपट अभिनेते मनोज जोशी यांनी या मालिकेत सूत्रधाराची भूमिका साकारली आहे.
‘स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढयाची सर्वसमावेशक कथा’ 20 ऑगस्टपासून मराठीत प्रसारित
20 ऑगस्टपासून सहयाद्री प्रादेशिक वाहिणीवरून ‘स्वराज – भारताच्या स्वातंत्र्य लढयाची सर्वसमावेशक कथा ’ही मालिका मराठीत प्रसारित होणार आहे. मराठी भाषेसह इंग्रजी , तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती, बंगाली, उडिया आणि आसामी अशा 8 प्रादेशिक भाषांमध्येही 20 ऑगस्टपासून रात्री 8 ते 9 वाजता प्रादेशिक वाहिण्यांवरून प्रसारित केली जाईल.