मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री घोटा देवी संस्थान मध्ये गैरव्यवहार करणाऱ्या कार्याध्यक्षां विरुद्ध अनेक तक्रारी करूनही कार्यवाही केली जात नसल्याने घोटा देवी येथील ग्रामस्थांनी 25 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची प्रशासनाकडून अद्याप साधी दखलही घेण्यात आलेली नाही.
हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथील गट नंबर 380 क्षेत्रफळ 7 हे. 23 आर ही जमीन खाजगी मालकीची असून जमिनीवर घोटादेवी संस्थानचे कार्याध्यक्ष यांनी तीर्थक्षेत्र विकास च्या नावाखाली निधीचा गैरवापर केलेला आहे तसेच निधीत भ्रष्टाचार केलेला आहे.
सदरील जमिनी संस्थांचे मालकीची नसून धर्मदाय आयुक्त कार्यालयात देखील ह्या जमिनीची नोंद नाही. याबाबत गावकऱ्यांनी अर्ज दिल्यानंतर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडून तसेच हिंगोली कार्यालयाकडून वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांना चौकशी करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे, मात्र अद्याप कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. तसेच सदरील कार्याध्यक्ष यांच्यावर ह्यापूर्वी गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा देखील नोंदविण्यात आलेला आहे.
सदरील कार्याध्यक्ष यांच्याविरुद्ध आजचा गायक अनेक तक्रारी संस्थांचे अध्यक्ष म्हणजेच तहसीलदार यांच्याकडे देऊन काहीही उपयोग झालेला नाही तसेच तहसीलदार यांचे काहीही चालत नसून साधे संस्थांचे अजीव सभासदांची यादी देखील वारंवार अर्ज देऊन गावकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे गावात असंतुषाचे वातावरण पसरले आहे.
घोटादेवी संस्थानचे कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची चौकशी करण्यात यावी व तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली झालेल्या निधीचे गैरव्यवहाराबाबत गुन्हा नोंद करण्यात यावा अन्यथा नाईलाजास्तव अर्जदार तसेच इतर गावकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 जानेवारीपासून आमरण उपोषणास बसावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला होता.
याप्रकरणी कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असून प्रशासनाकडून अद्यापही सदरील उपोषणाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर चंद्रभान अंभोरे, विलास शेळके, प्रमोद शेळके, वैजनाथ पावडे, ज्ञानेश्वर पावडे, अरुण पावडे, गोपाल जगताप आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.