‘गमा’
हळद उत्पादक जिल्हा म्हणून हिंगोलीची राज्यासह भारतातील इतर राज्यात देखील ओळख आहे ;मात्र ज्या हळदीने हिंगोलीच्या लौकिकात भर पडली त्या हळदीला ‘जीआय’ म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन (भौगोलिक मानांकन) नाही. विशेष म्हणजे वसमत तालुक्यात हळद प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली जात आहे. सदरील उद्योग आपण आणला म्हणून त्याचे श्रेय लाटण्याचे काम विविध पुढाऱ्यांकडून केले जात आहे. मात्र, त्याच हळदीला जीआय नाही हे अपयश देखील या पुढार्यांनी स्वीकारायला हवे..
भौगोलिक उपदर्शन पत्रिका जिओग्राफीकल इंडिकेशन्स जर्नल मध्ये महाराष्ट्रातील नऊ उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील तीन उत्पादन ही एकट्या लातूर जिल्ह्यातील आहेत.
त्यामध्ये या जिल्ह्यातील पानचिंचोलीच्या ‘पटडी चिंच’ बोरसुरी येथील ‘बोरसुरी तूर डाळ’ आणि आशिव येथील ‘कास्ती कोथिंबीर’ या उत्पादनांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्याची ओळख तशी आवर्षणग्रस्त, कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा अशी आहे.
याउलट हिंगोलीचे आहे तर यंदा मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असे मानले जाते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार येथे खरीप व रब्बी हंगामातील विविध पिके घेतली जातात. त्यामध्ये हळद हे पीक अग्रेसर असून त्या खालोखाल रब्बी हंगामातील सोयाबीन येते. हळद उत्पादक जिल्हा म्हणून हिंगोली ओळखली जाते.
हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन जिल्ह्यात घेतले जात असल्याने ्यावर आधारित प्रक्रिया उद्योगही असायला हवेत ही रास्त अपेक्षा. हिंगोली जिल्हा वाशियांची ही अपेक्षा पूर्ण होऊ लागली आहे. वसमत तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा हळद प्रक्रिया उद्योग उभारणीला प्रारंभ होत आहे.
सदरील उद्योग आम्ही आणला म्हणून जो तो या उद्योगाचे श्रेय घेण्यास धावू लागला. मात्र ज्या हळदीने हिंगोलीला वेगळी ओळख दिली त्या हळदीचा ‘जीआय’ नाही आता सदरील ‘जीआय’ नाही आणि तो आम्ही मिळवून दिला नाही याची जबाबदारी ही कोणीतरी घ्यायला हवी..
काय आहे ‘जीआय’
जिओग्राफिकल इंडिकेशन (भौगोलिक चिन्हांकन) हे त्या विशिष्ट परिसरातील मूळ कृषी विषयक, नैसर्गिक किंवा उत्पादित माल ओळखण्यासाठी वापरला जातो. या मालाचा उगम त्या – त्या विशिष्ट प्रदेशातील असतो जीआय मानांकन हे एखादी वस्तू किंवा पदार्थ तसेच उत्पादन हे खास दर्जाचे किंवा एकमेवाद्वितीय असल्याची पावती आहे.
जैवविविधता नोंदवहीत घेतली गेली दखल
हिंगोली हा हळद उत्पादक जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. या पिकाची नोंद जैवविविधता नोंदवही तयार करणाऱ्या काही संस्थांनी घेऊन छायाचित्रासह महाराष्ट्र राज्य जैवविविधता महामंडळ नागपूर यांना केव्हाच सादर केली आहे.
कृषी विभागाकडून प्रस्ताव लिहिणे सुरू
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेतले जाते. हळद उत्पादक जिल्हा म्हणून मागील कित्येक वर्षांपासून हिंगोली ओळखली जाते. अशा या हळदीला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी हिंगोली जिल्हा कृषी कार्यालयाकडून आता प्रस्ताव लिहून पाठविला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.