शारदीय नवरात्रोत्सव – सतीश खिल्लारी
सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. या निमित्त भाविक – भक्तात आणि नागरिकांमध्ये प्रसन्नता आणि उत्साहाचे वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यात साडेतीन शक्तीपीठांपैकी काही शक्तीपीठांच्या प्रति जागृत मातांचे देवस्थान आहेत. सदरील देवस्थान जागृत असल्याने येथे हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यातील भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. नवरात्र उत्सवानिमित्त सेनगाव तालुक्यातील कवठा येथील जागृत जगदंबा मातेविषयीचा ‘मार्मिक महाराष्ट्र’चे सेनगाव येथील तालुका प्रतिनिधी सतीश खिल्लारी यांचा स्पेशल रिपोर्ट…
सेनगाव तालुक्यातील कवठा येथे प्राचीन व जागृत जगदंबा मातेचे मंदिर आहे. मातेच्या दर्शनासाठी येथे नवरात्री उत्सवासह वर्षभर भाविक भक्त येत असतात. येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताची मनोकामना आई जगदंबा माता पूर्ण करते, अशी आख्यायिका आहे…
जगदंबा मातेचे मंदिर अति प्राचीन असून कवठा आणि वरुड चक्रपान या गावांच्या शिवेवर आहे. मंदिराच्या उत्खननामध्ये जुने शिलालेख सापडलेले होते.
उंच टेकडीवर आधी केवळ चार पत्राचे जगदंबा मातेचे छोटेसे मंदिर होते. मात्र मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्याने येथे दर्शनासाठी गर्दी होऊ लागली. येणाऱ्या भाविकांना मंदिरात बसता यावे.
तसेच सोयी – सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून कवठा आणि वरुड चक्रपान गावातील गावकऱ्यांनी स्वखर्चाने मंदिराचा जीर्णोद्धार केला. आता या ठिकाणी विशालकाय जगदंबा मातेचे मंदिर आहे. मंदिरात आई जगदंबा मातेसह इतर हिंदू देवदेवतांच्या मुर्त्या आहेत.
येथे वीज, पाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड ही करण्यात आलेली आहे. त्यामुळे जगदंबा मातेचा परिसर हिरवळीने नटून गेला असून तो भाविक भक्तांना आपल्याकडे अधिकच खुणावून घेत आहे.
हिंगोली जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील अनेक भागातून भाविक भक्त जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येतात आणि आपली मनोकामना जगदंबा मातेला सांगतात. त्यांची ही मनोकामना जगदंबा माता पूर्ण करते, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येथे बाराही महिने भाविक भक्त येत असतात.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना येथे मंदिर संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने फराळ पाण्याची व्यवस्था केली जाते. तसेच विजय दशमी दसऱ्याच्या दिवशी येथे यात्राही भरते. सध्या नवरात्रीनिमित्त येथे जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत आहेत…
कवठा येथील जागृत जगदंबा मातेचे मंदिर हे सेनगाव पासून अंदाजे 6 कि.मी.च्या अंतरावर आहे.