मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जांभरून – पुसेगाव रोडवर विनापरवाना सागवानची वाहतूक करणारा विना पासिंगचा टेम्पो हिंगोली वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार आणि त्यांच्या पथकाने पकडला. यावेळी सागवानसह 1 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जिंतूर येथील एका व्यक्तीवर भारतीय वन अधिनियम अन्वय कारवाई करण्यात आली.
हिंगोली येथील विभागीय वन अधिकारी मनोहर गोखले व हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 9 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता जांभरून – पुसेगाव रोडवर एम एच – 34 एम 2502 टाटा कंपनीचा 407 या टेम्पोमधून विनापासी विनापरवाना सागवान गोलमालाची वाहतूक होत असताना सदरील वाहन पकडण्यात आले.
आरोपी मोसिन खा मनोहर खा पठाण (रा. जिंतूर जि. परभणी) याच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 42 व 52 तसेच महाराष्ट्र झाडे तोड अधिनियम 1964 चे कलम 3 व 4, त्याचप्रमाणे महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे नियम 31 नुसार प्रथम वन गुन्हा क्रमांक 1/ 2024 दि. 9 / 2 / 2018 कार्यवाही करण्यात आली.
यावेळी टेम्पो (ज्याची किंमत 80 हजार रुपये) व सागवान गोलमाल (ज्याची किंमत 48 हजार रुपये) असा एकूण 1 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास हिंगोली वनपरिमंडळ अधिकारी एस. एस. चव्हाण हे करत आहेत.