Marmik
Hingoli live

निवडणूक कालावधीत आचार संहितेचे काटेकोर पालन करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सर्व विभागांनी या निवडणुकीत प्राधान्यक्रम आणि तातडीने करावयाची कार्यवाही करावी. तसेच संपूर्ण निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात  आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व विभागप्रमुख आणि जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे, डॉ. सचिन खल्लाळ आणि उपजिल्हाधिकारी समाधान घुटूकडे उपस्थित होते.

हिंगोली मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून मतमोजणी विविध टप्प्यावर अनुषंगीक कार्यवाही करण्यात यावी. आदर्श आचारसंहितेच्या पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींचे छायाचित्र किंवा नाव हटविण्याची प्रक्रिया तातडीने करण्यात यावी. तसेच कार्यालयांनी त्यांच्याकडील सुरु असलेली कामे आणि पूर्ण झालेली कामे यांची माहिती तातडीने सादर करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने वाहनांची व्यवस्था करण्यात यावी. निवडणूक कालावधीत शासकीय वाहनांचा दुरुपयोग होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया, मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात येतील. या प्रशिक्षणादरम्यान निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मतदानाची सोय करण्यात आली आहे. यावेळी सेवेत असणाऱ्या संपूर्ण कर्मचाऱ्यांचे मतदान करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ईव्हीएम आणि व्हीहीपॅट मशिनची पुरेशी उपलब्धता आहे.

या मशिनची तपासणी केल्यानंतरच विधानसभानिहाय वाटप करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर पुरेशा सोयी उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मतदारसंघात 2 हजार 006 मतदान केंद्र राहणार असून यातील निम्म्या मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे.

मतदानाचा टक्का वाढावा आणि नागरिकांचा निवडणुकीत सक्रीय सहभाग नोंदवावा, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रामुख्याने कमी मतदान झालेल्या मतदान केंद्राच्या भागात जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे.

तसेच 85 वर्षे वय आणि दिव्यांग मतदार मतदान केंद्रावर येण्यास सक्षम नसल्यास त्यांना घरुन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे रितसर मागणी नोंदवावी लागणार आहे. नियमानुसार चित्रिकरण करुन संबंधित व्यक्तीचे मतदान करुन घेण्यात येणार आहे.

निवडणुकीदरम्यान कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. नागरिकांनी तक्रारीसाठी सी व्हीजील, व्होटर हेल्पलाईन, नो युवर कँडिडेट यासारखी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची सर्व प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी वेगाने कामकाज पार पाडावे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविलेल्या कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी सुरु करावी. सर्व भरारी पथकांचा प्रभावी वापर करणे आवश्यक असून, एसएसटी, एफएसटी अशी भरारी पथके तात्काळ कार्यान्वित करावीत.

निवडणूक प्रक्रियेमध्ये सी- व्हिजील अँपचा प्रभावी वापर होणार असून, या ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबत वेळेत कारवाई होणे आवश्यक आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहितेच्या काळात चोख कारवाई करुन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कारवाई करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

सर्व समितीच्या पथक प्रमुखांनी वेगाने कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले. आचारसंहितेच्या अनुषंगाने वेळेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सर्व संबंधितांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय इमारती, होर्डींग्जवरील संदेश, पोस्टर, झेंडे, पताका त्वरीत काढून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रभाग अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रभागाची पाहणी करुन नव्याने, फलक लावले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. सभेसाठी परवानगी देतांना जो प्रथम येईल व आवश्यक ते शुल्क भरेल त्याच व्यक्तीला प्राधान्याने परवानगी देण्याची कार्यवाही करावी. सद्या सुरु असलेली कामे सुरु ठेवावीत, परंतु नवीन कामे सुरु करु नयेत.

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट रॅण्डमायझेशनची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असून, सर्व संबंधीत यंत्रणांना याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच सर्व मतदान केंद्रांना सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भेटी देवून ते सुव्यवस्थित असल्याबाबत आणि आवश्यक त्या सर्व पायाभूत सूविधा उपलब्ध असल्याबाबतची खात्री करुन घ्यावी.

मतदान केंद्रांवरील फर्निचर, लाइट, पाणी, रॅम्प, खिडक्यांची दुरुस्ती करुन घ्याव्यात. तसेच मतदान केंद्र परिसरात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले.

अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी यावेळी उपस्थित पथक प्रमुखांना मतदारांच्या‌ विविध फॉर्म बाबत माहिती दिली.

यावेळी सर्व विविध समित्यांचे नोडल अधिकारी आणि खाते प्रमुखांची उपस्थिती होती.

Related posts

काढलेल्या सोयाबीनचा झाला ‘चिखल’! खानापूर चित्ता येथील चित्र

Gajanan Jogdand

घोटा देवी संस्थान मध्ये आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या कार्याध्यक्षांवर कारवाई करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 जानेवारीपासून उपोषण सुरू, प्रशासनाकडून अद्याप दखल नाही

Gajanan Jogdand

आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या 12 सोशल मीडिया वापरकर्त्यावर कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment