मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वसमत तालुक्यातील पळशी येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा अवघ्या चार दिवसात हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केला आहे. यावेळी पथकाने नगदी 60 हजार रुपये व एक कार असा एकूण दोन लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच एका आरोपीस ताब्यात घेतले आहे.
वसमत तालुक्यातील पळशी येथे 18 जानेवारी रोजी रात्रीच्या दरम्यान फिर्यादी सोपान बर्डे यांच्या घराचे मागील चॅनेल गेटचे लॉक तोडून व घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून आज प्रवेश केला. तसेच कपाटातील नगदी व सोन्या – चांदीचे दागिने असा दोन लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपींनी चोरून नेला होता.
याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील गुन्हा तात्काळ उघड करून त्यातील आरोपींना अटक करण्याबाबत हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सूचना केली होती.
त्यावरून हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तसेच तपास चक्र गतिमान करून व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने तपास करत अवघ्या चार दिवसात सदरील गुन्हा हा पळशी येथील सचिन मोहन शिंदे (वय 28 वर्ष) याने त्याच्या इतर साथीदारामार्फत मिळून केल्याचे निष्पन्न केले.
तपास पथकाने 22 जानेवारी रोजी सापळा रुचून आरोपी सचिन मोहन शिंदे यास सीताफिने ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करता सदरचा गुन्हा त्याचे इतर दोन साथीदारा विशाल चव्हाण व योगेश पवार यांच्यासह मिळून केल्याची कबुली दिली.
पोलीस पथकाने आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी करून त्याच्या हिश्याला आलेले 60 हजार रुपये नगदी, तसेच एक चार चाकी वाहन किंमत दोन लाख रुपये व दोन लोखंडी रॉड असे साहित्य जप्त करून आरोपी तपासासाठी हट्टा पोलीस ठाण्यात हजर केले.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, शेख बाबर, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, विठ्ठल कोळेकर, तुषार ठाकरे दीपक पाटील यांनी केली.