मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वसमत शहरातील मोंढा परिसरातील ट्रेडिंग कंपनीच्या दुकानाचे टीन पत्रे वाकून केलेल्या चोरीचा गुन्हा हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केला आहे. यावेळी पथकाने एका आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालून सदर गुन्हे करणाऱ्या आरोपी पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत आदेश देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
29 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्री वसमत शहरातील बालाजी ट्रेडिंग कंपनी दुकानाचे टीन पत्रे वाकवून दुकानातील 16 हजार रुपये चोरीला गेल्या संदर्भात वसमत शहर पोलीस ठाण्यात कलम 380 भादंवि अन्वय गुन्हा दाखल झाला होता.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांचे पथक घटनास्थळी जाऊन गुन्ह्याचा तपास करत होते.
5 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की, वसमत शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील इसम नामे जसविंदर सिंग उर्फ जसू पिता रघुवीरसिंग चव्हाण व त्याच्यासोबत बादलसिंग या दोघांनी मिळून बालाजी ट्रेडिंग कंपनी दुकानातील रोख रक्कम 16 हजार रुपये चोरून नेले अशी माहिती मिळाली.
यावरून पोलीस पथकाने ही इसम नामे जसविंदर सिंग उर्फ जसू चव्हाण यास ताब्यात घेऊन विचारपूस केले असता त्याने सदरचे बालाजी ट्रेडिंग कंपनी दुकानातील रोख रक्कम 16 हजार रुपये चोरल्याचे कबूल केले.
तसेच त्याच्या हिस्स्याला आल्याने चोरलेली रक्कम आठ हजार रुपये काढून दिले. आरोपीस मुद्देमालासह वसमत शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार शेख बाबर, गजानन पोकळे, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, विठ्ठल काळे, तुषार ठाकरे यांनी केली.