मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत स्तरावर दुरविण्यात आलेल्या हॅन्ड वाश, स्टेशन स्टॅन्ड पुरविण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
15 व्या वित्त आयोग निधी हा ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांसाठी वापरण्यात येत असतो, परंतु आपल्या विभागातील काही अधिकाऱ्यांनी समर्थ इंटरप्राईजेस या पुरवठादार संस्थेकडून वाढीव दराने हॅन्ड वॉश, स्टेशन, स्टॅन्ड, टाकी खरेदीसाठी ग्रामसेवकांवर दबाव निर्माण करून त्यांना खरेदी करण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात या संदर्भात शासनाचे कुठलेही स्पष्ट आदेश उपलब्ध नसताना खरेदी करण्यास सांगण्यात आले. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचा देखील समावेश आहे. पुरविण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा अतिशय निकृष्ट असून बाजार मूल्यापेक्षा तिप्पट ते चौपट पुरविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायत मध्ये हे साहित्य पुरविण्यात आले असून यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. गावच्या विकासासाठी निधी येतो. त्यामध्ये पण आपल्या अधिकाऱ्यांच्या मनमाणीमुळे निधी योग्य कामासाठी खर्च होत नाही. जिल्ह्यात कोरोनाचा कुठलाही प्रादुर्भाव नसताना देखील कोरोनाच्या नावाखाली खर्च करण्यात आला.
या प्रकरणातील समर्थ इंटरप्राईजेस यांनी बिल कोटेशन वर नमूद केलेला पत्ता देखील बनवत आहे. याप्रकरणी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून संबंधित पुरवठादार व भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कार्यवाही न झाल्यास 24 नोव्हेंबर पासून आपल्या कार्यालयासमोर सरपंच संघटनेच्या वतीने उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष लखन शिंदे, सरपंच शाळुबाई चव्हाण, उमेश पोले, जयश्री लोंढे, दिपाली शिंदे, निर्मला बगाटे, गणेशराव पोले, परमेश्वर मुकाडे, अनुसयाबाई पोले, राजेश पाटील, बाबुराव सावळे, गंगाराम बगाटे, कल्याण पोले, जगन्नाथ सावळे, गजानन मगर, पुंडलिकराव हाके, प्रभाकर हाके, राजू लोंढे, गंगाराम बगाटे, राजू बगाटे, रवी सरकटे, सुभाष डोरले, बालाजी डोरले, ज्ञानेश्वर जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.