मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वसमत उपविभाग हद्दीत दरोडेच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे; मात्र यावेळी घटनास्थळावरून तिघे पळून गेले तर दोघांना पकडण्यात आले.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच चोरी, घरफोडी, दरोडा हे गुन्हे घडू नये. त्यावर नियंत्रण असावे म्हणून सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नियमित तपासणी, सतर्क रात्रगस्त व नाकाबंदी तसेच प्रभावी आठवड्यातून चार वेळा विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविले जात आहे.
3 नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा यांनी धडक कार्यवाही केली. उपविभाग वसमत हद्दीत रात्री च्या दरम्यान गस्त घालत जात असताना गोपनीय माहिती मिळाली की, वसमत ते बाभुळगाव जाणाऱ्या रोडवर मळी नदीच्या पुलाच्या बाजूला काही व्यक्ती हे अंधारात दबा धरून व एखादा गंभीर मालाविरुद्धचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे थांबलेले आहेत, अशी खात्रीलायक माहिती मिळाली.
यावरून वसमत ग्रामीण पोलीस ठाणे बीट अंमलदार यांना सोबत घेऊन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी तात्काळ पोहोचून छापा मारला असता तेथे एकूण 5 व्यक्ती अंधारात इतरत्र पळून जात असल्याचे दिसले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व पोलिसांनी पाठलाग करून दोन इसमांना पकडले.
तेथे असलेल्या व्यक्तींपैकी तीन व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पकडलेल्या दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद होत्या.
यावेळी रवी अनिल मारवे (वय 22 वर्षे रा. महारळगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे), राजू तुकाराम कासणे (वय 30 वर्ष रा. वडगाव शिंदे तालुका लोहगाव जिल्हा पुणे) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी वापरणारे हत्यार जात मोबाईल दोन, खंजर एक, एक लोखंडी रॉड, पकड, मिरची पूड व दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले.
नमूद आरोपी व घटनास्थळावरून पळून गेलेले त्यांचे साथीदार सुरज नितीन जाधव (रा. पूर्णा सहकारी साखर कारखाना बाभूळगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली) व इतर दोन आरोपी असे एकूण 5 व्यक्ती विरुद्ध वसमत ग्रामीण पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या तक्रारीवरून भादंविसह कलम 4 / 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यामावार हे करत आहेत.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, तुषार ठाकरे तसेच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे विजय उपरे, भुजंग भांगे यांच्या पथकाने केली.