कालबाह्य झालेली औषधी
आरोग्याचा स्टेटसस्कोप – गजानन जोगदंड
भाग – 1
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / हिंगोली – जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य यंत्रणेचे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडावा इतपत समस्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आरोग्य केंद्रातून रुग्ण बरे होण्यासाठी कालबाह्य झालेली औषधी दिली जात आहेत. यावरून औषधी अधिकारी (सीएचओ / एमओ) हे उपकेंद्र आणि आरोग्य केंद्रावर महिनो महिने फिरकतच नसल्याचे दिसते.
राज्यात सध्या डोळे येण्याची साथ आली आहे. ही साथ एवढी भयंकर आहे की तज्ञ सांगताहेत की, दृष्टीही जाऊ शकते एवढी भयंकर ही साथ आहे. जिल्ह्यात या साथीच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा काय काम करते याची शहानिशा करण्यासाठी मार्मिक महाराष्ट्र समूहाची टीम सेनगाव तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या जांभरून तांडा येथे पोहोचली. येथे पोहोचल्यानंतर जे वास्तव पुढे आले ते हादरवून टाकणारे होते.
जवळपास सात ते आठ गावांसाठी जांभरून तांडा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आलेले आहे. उपकेंद्राची बिल्डिंग नवीन आहे; मात्र या उपकेंद्रावर नियुक्त अधिकारी या गावात व उपकेंद्रावर फिरकतच नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.
उपकेंद्रातून सिस्टर ची मदतनीस असलेली एक महिला जिला कोणत्या आजारावर कोणती गोळी द्यायची हे शिकवल्याने व सांगितल्याने सदरील महिला अधिकारी आणि सिस्टर च्या गैरहजेरीत रुग्णांची देखभाल आपल्या परीने करते. तिला सूचना केल्याप्रमाणे ही महिला प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देते मात्र (सीएचओ / एमओ) यांचे कर्तव्य आहे की आपण ज्या गोळ्या देत आहेत किंवा उपकेंद्रात उपलब्ध करून देत आहोत. त्यांची तारीख पाहणे यासाठी महिन्यातून किंवा दोन महिन्यातून तरी एकदा या उपकेंद्रात येणे गरजेचे.
मात्र येथील (सीएचओ / एमओ) हे मागील 6 महिन्यापासून येथे फिरकलेच नाहीत. आरोग्य परिचारिका (सिस्टर) या महिन्यातून काही दिवस येथे येऊन रुग्णसेवा देतात, मात्र रुग्णांना औषधी देताना त्यांची तारीख पाहिलीच जात नाही. हे काम सीएचओ / एमओ यांचे आहे.
पण हे महाशय येथे फिरकलेच नसल्याने रुग्णांचा जीवच धोक्यात आला आहे. येथे गर्भधारणा झालेल्या महिलांना प्रेग्नेंसी मध्ये रक्तवाढीसाठी देण्यात येणाऱ्या आयरन आणि फॉलिक ऍसिड या गोळ्यांची काल मर्यादा 7/2022, 3/2023 अशी असताना आणखीनही या उपकेंद्रातून या गोळ्या दिल्या जात होत्या.
तसेच सर्दी, पडसे, ताप, खोकला यांच्या टॅबलेट आणि गोळ्या देखील कालबाह्य झालेल्या दिल्या जात होत्या. यातील अनेकांच्या टॅबलेट वर एक्सपायरी डेट दिसतच नव्हती. मार्मिक महाराष्ट्र समूह प्रतिनिधीने त्यांना सदरील औषधीचे महत्व आणि कालबाह्य झालेल्या औषधी ह्या किती घातक असतात.
याबद्दल सांगितल्यानंतर येथील परिचारिका मदतनीस यांनी सदरील गोळ्या तात्काळ जमा करून त्या वेगळ्या केल्या. दुर्गम भागातील आरोग्य उपकेंद्र आणि आरोग्य केंद्रांना जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, औषध निर्माता अधिकारी व आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यास येथील गोंधळ निदर्शनास येईल आणि कशा पद्धतीने रुग्णांच्या जीवाशी खेळले जाते याचा प्रत्यय देखील येईल.
कालबाह्य झालेली औषधी ही विष समान असतात. त्याने रुग्ण दगावू देखील शकतो. एवढी मोठी बाब येथे घडत आहे. यावरून जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य यंत्रणेचे दुर्गम भागातील जांभरून तांडा येथील आरोग्य उपकेंद्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात तात्काळ चौकशीचे आदेश देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.
डोळ्यांची साथ रोखण्यासाठी औषधी नाहीत
राज्यात डोळ्यांची साथ आली आहे. या दृष्टीने खबरदारीच्या उपायोजना आरोग्य विभागाकडून केला जात आहेत. या साथीला रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी कैलाश शेळके यांना विचारले असता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आय ड्रॉप आणि आवश्यक औषधी साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच जांभरून तांडा आरोग्य उपकेंद्राने आरोग्य केंद्रातून त्यांचा साठा घेऊन जावा, असेही त्यांनी मार्मिक महाराष्ट्र समूहाकडे बोलताना सांगितले. जांभरून तांडा येथील एका व्यक्तीचे डोळे आले असल्याचे गावातील ग्रामस्थांनी सांगितले. या व्यक्तीच्या चारासाठी येथे औषधी व हायड्रोप उपलब्ध नव्हते.