मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्ह्यातील डोंगराळ व दुर्गम भागात असलेल्या सेनगाव तालुक्यातील जांभरून तांडा येथे ग्रामस्थ व रुग्णांना 2022 वर्षातील एक्सपायरी डेट असलेली औषधी दिली जात आहेत. या संदर्भात मार्मिक महाराष्ट्र मध्ये 1 सप्टेंबर रोजी वृत्त झळकले होते; मात्र जिल्हा आरोग्य विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाच टाऊन सोडावेसे वाटेना असे दिसते.
मार्मिक महाराष्ट्रकडून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील वास्तव जनतेपुढे मांडले जात आहे. 1 ऑगस्ट रोजी पहिल्या भागात जिल्ह्यातील दुर्गम भागात वसलेल्या जांभरून तांडा येथील उपकेंद्रास मार्मिक महाराष्ट्र समूह टीमने भेट देऊन तेथील वास्तव परिस्थिती जाणून घेतली.
यावेळी येथे सीएचओ / एमओ हे महिनो महिने येतच नसल्याचे निदर्शनास आले. तसेच येथे नियुक्त आरोग्य सेविका यादेखील आठवड्यातील काही दिवसच येथे येऊन रुग्ण सेवा करतात.
या उपकेंद्राचा सर्व कारभार आरोग्यसेविकेचे मदतनीस असलेल्या महिलेवर येऊन पडलेला आहे. सदरील आरोग्य उपकेंद्रातून मागील कित्येक दिवसांपासून एक्सपायरी डेट झालेल्या औषधी गोळ्या दिल्या जात आहेत.
3/2023, 7/2022 अशी एक्सपायरी डेट असलेल्या औषधी गोळ्या या उपकेंद्रातून वाटप केल्या जात आहेत. एक प्रकारे विषयच येथील उपकेंद्रातून ग्रामस्थ व रुग्णांना दिले जात आहे.
‘आरोग्य केंद्र उठले ग्रामस्थांच्या जीवावर! रुग्णांना दिली जात आहेत एक्सपायरी औषधी!! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची दुर्लक्ष’ या मथळ्याखाली मार्मिक महाराष्ट्र च्या वेब पोर्टलवर वृत्त देखील झळकली होते. येथे ग्रामस्थ व रुग्णांच्या जीवाशी एवढा मोठा खेळ खेळला जात असताना सदरील प्रकाराकडे जिल्हा आरोग्य यंत्रणा डोळे झाक करत असून आरोग्य यंत्रणा झोपेचे सोंग घेत आहे.
अद्याप सदरील प्रकार थांबलेला नसून येथे जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा तालुका आरोग्य अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केलेली नाही. जिल्हा आरोग्य यंत्रणेस जिल्ह्यातील ग्रामस्थांच्या आरोग्याशी काही घेणे देणे आहे की नाही, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
उपकेंद्राकडे एकही अधिकारी फिरकला नाही
दुर्गम भागात वसलेल्या जांभरून तांडा येथे मागील कित्येक महिन्यांपासून गर्भधारणा झालेल्या महिलांसह सामान्य रुग्णांनाही एक्सपायरी डेट झालेल्या औषधी गोळ्या दिल्या जात आहेत. ही औषधी नसून एक प्रकारे विष दिले जात आहे. सदरील प्रकाराचे गांभीर्य जिल्हा आरोग्य यंत्रणेला नाही. त्यामुळे अद्याप जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अथवा आरोग्य यंत्रणेतील एकाही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली नाही. यासंदर्भात मार्मिक महाराष्ट्रने जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळके यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मेडिकल ऑफिसर पाठविला जाईल. त्यांच्याकडून चौकशी केली जाईल. चौकशी केल्यानंतर अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल असे थातूर-मातूर उत्तर दिले.