गणेश पिटेकर
महाराष्ट्रात भाजपने शेवटी आदर्श घोटाळ्यात अडकलेल्या अशोकराव चव्हाण यांना आपलेसे करून घेतले. आता यातून अशोकरावांची सुटका होईल हे निश्चित मानले जात आहे .ज्यांनी – ज्यांनी भ्रष्टाचार केला ते भाजपात जाऊन सुचिर्भूत झाले असेच म्हणावे लागेल. कारण या नेत्यांच्या नंतर कोणत्याही चौकशा झाल्या नाही .उलट त्यांना चांगली पदेही मिळाल्याचेच दिसते. आता अशोकरावानाही एखादे मोठे पद दिले जाईल… जनताच बिचारी गोळी – भाबडी ठरून हा सर्व प्रकार पहात आहे. विशेष म्हणजे हे कुठेतरी थांबले पाहिजे हे कोणालाच वाटत नाही. तर विरोधी पक्षच नको असे भाजप व मित्रपक्षास वाटू नये हे कशावरून? यामुळे लोकशाहीला पोषक अशी यंत्रणा च निकाली निघताना दिसते…
महाराष्ट्राचे राजकारण सध्या वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. कोणाला निष्ठावान म्हणावे, कोणाला गद्दार हाच प्रश्न बर्याच जणांना पडला असणार! कोण, केव्हा, कशासाठी पक्ष सोडून जाईल हे सांगता येत नाही. जनतेने आपले प्रश्न सोडवण्यासाठी आमदार व खासदार यांना विधानसभा, संसदेत निवडून पाठवलेले असते. बिचाऱ्या भोळ्या – भाबड्या जनतेला वेड्यात काढून राजकारणी मंडळी आपला स्वार्थ साधताना दिसत आहेत.
मतदारसंघातील जनतेचे पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, संरक्षण यासह इतर अनेक प्रश्न बाजूला ठेवून नेते मंडळी स्वतःच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यात व्यस्त आहेत.. दुसरीकडे ते आपले भ्रष्टाचार आणि काळे धंदे सुरळीत चालू असताना ईडी, सीबीआय या आणि केंद्रीय यंत्रणा वापरून या सरळ मार्गी नेत्यांना भाजप आपल्या पक्षात घेण्यास उतावीळ झाला आहे. तत्त्व, निष्ठा आणि प्रामाणिकपणा फक्त जनतेला सांगण्यासाठीच! वेडी जनता ती धर्म, जात आणि नेत्याच्या प्रेमात पडून स्वतः च्या पायावर धोंडा पाडून घेत आहे.
आपल्या मुलांना शिक्षण व रोजगार मिळते का? आपल्या पगारात वाढ झाली का? महागाई मोठ्या प्रमाणावर वाढत असताना मिळणारा पगार अपुरा पडताना, किती शांत राहायचे? हा विचार नागरिकांनी करायला हवा. एखाद्या नेत्याच्या प्रेमात पडून दररोजचे प्रश्न सुटणार आहे? त्यातही फक्त स्वप्न दाखवणार्या, मीच किती महान सांगणार्या नेत्यांपासून लांब राहणे देश आणि सर्वांसाठी हिताचे ठरेल.
आता जनतेनेच दल बदलू नेत्यांना धडा शिकवणे योग्य राहील. जनतेला गृहीत धरून या पक्षात त्या पक्षात जाणे हा जनतेचा विश्वासघात ठरत नाही का? जनतेने निवडणुकीच्या वेळी संबंधित पक्ष पाहून मतदान केले असेल ना? नारायण राणे, राधाकृष्ण विखे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण या नेत्यांना जनते पेक्षा स्वतः आणि संपत्ती प्यारी असते..
जनतेचे प्रश्न सुटत नसल्याने असहाय्य जनता दररोजच्या प्रश्नांसह शाळांचे खाजगीकरण, वाढते शैक्षणिक शुल्क, आरोग्य, बेकारी या प्रश्नात आणखीनच गुरफटत चालली आहे..देश आणि महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहून राजकारणातील ही अनैतिकतेची लागण सर्वांना तर होणार नाही ना? जनतेने या दल बदलू नेत्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी. नाहीतर येणाऱ्या काळात ते आणखी शेफारतील! वेळीच सावध होण्याची वेळ आली आहे..