मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेने मोटार सायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करून एकूण 14 मोटरसायकल सह सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिंगोली शहर व जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून मोटार सायकल चोरीचे गुन्हे घडले होते. नमूद मोटार सायकल चोरी करणारी टोळी पकडून मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यांवर आळा घालण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात तपास पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून गोपनीय माहितीच्या आधारे हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील आरोपी नामे एजाज मोहम्मद अकबर (33 वर्ष राहणार गंगानगर, देगलूर नाका, नांदेड हं. मु. आझम कॉलनी हिंगोली) व शेख हकीम शेख कासिम (वय 32 वर्षे राहणार पलटण हिंगोली) यांना निष्पन्न करून नमूद आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यातील अनेक मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली.
सदर आरोपीतांकडून विविध कंपनीच्या 14 मोटार सायकली एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील विविध गुन्हे उघड करण्यात आले आहे.
तसेच नमूद आरोपींनी नांदेड जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भोकर व इतवारा परिसरातही मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. आरोपींवर नांदेड जिल्ह्यात घरफोडी व मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून नमूद आरोपीतांकडून अजूनही मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार भगवान आडे, शेख शकील, नितीन गोरे, विठ्ठल कोळेकर, राजू ठाकूर, ज्ञानेश्वर सावळे, विठ्ठल काळे, आकाश टापरे, किशोर सावंत, तुषार ठाकरे, सुमित टाले, जयप्रकाश झाडे, पारू कोटमिते, रवीना धुमनर, सुनील अंभोरे, संभाजी लेकुळे, किशोर कातकडे आदींच्या पथकाने केली.